Views


*जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची :-यशवंत भंडारे, कृषी व पर्यटन क्षेत्राला मोठा वाव*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

कोणत्याही क्षेत्रात विकासकामे करताना सरकारला जिल्ह्याच्या मुलभूत व अत्यावश्यक गरजांची माहिती गरजेची असते. ती माहिती पत्रकारांच्या माध्यमातून उपलब्ध होते. कारण ती बातमी कोण्या एका व्यक्तीविरोधात नसून विकासाच्या दृष्टीने पत्रकारांनी मांडलेली सकारात्मक स्थिती असते. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी तथा उपसंचालक यशवंत भंडारे यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त पत्रकारांच्यावतीने मंगळवारी जिल्हा माहिती कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, दैनिक संघर्षचे संपादक संतोष हंबीरे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रसारण अधिकारी कृष्णा शिंदे, संपादिका शीला उंबरे, अरुण गंगावणे, पांडुरंग मते, मल्लिकार्जुन सोनवणे, जी.बी. राजपूत, हुंकार बनसोडे, प्रशांत कावरे, मच्छिंद्र कदम, बिभीषन लोकरे, गिरीश जव्हेरी, ज्योतीराम निमसे, मच्छिंद्र कदम, अमोल गाडे, शितल वाघमारे, राहुल कोरे, रहीम शेख, कुंदन शिंदे, जब्बार शेख, डी.के. शेख, नवाब मोमीन, दिलीप जानराव, नंदू पवार, चित्रा घोडके, भीमराव पडवळ, कविता राठोड, अनिल वाघमारे, शेषराव पवार आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भंडारे म्हणाले की, जिल्हा विकासाच्या बाबतीत मागास असून आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता करणे हे लोकप्रतिनिधी व सत्ताधारी मंडळींचे काम असते. मात्र राजकीय मंडळींना आवश्यक असलेल्या विकास कामाबाबतच्या त्रुटींची पूर्णपणे माहिती नसते. त्या त्रुटी पत्रकार प्रकर्षाने आपल्या लेखणीच्या माध्यमातून बातमीद्वारे समाजासमोर मांडण्याचे काम करतात. विशेष म्हणजे एखाद्या विभागाच्या विरोधात बातमी आली म्हणून कोणीही त्या पत्रकारांचा वैयक्तिक राग व द्वेष करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्ह्यामध्ये पर्यटनाला भरपूर वाव असून त्यासाठी आराखडा करावा. जिल्ह्यातून सोलापूर, औरंगाबाद व नांदेड या जिल्ह्यांना जोडणारे रस्ते होत असल्यामुळे धार्मिक पर्यटन क्षेत्रामध्ये विकास केल्यास मोठी उलाढाल होऊ शकते. तर शेती व शेत मालावर प्रक्रिया उद्योग चांगल्या प्रकारे उभारु शकतात. तसेच सोलापूर- उस्मानाबाद रेल्वे सुरु झाले तर जिल्ह्याच्या विकासामध्ये मोलाचा दगड ठरणार आहे. उस्मानाबादचे पत्रकार व पत्रकारिता सकारात्मक असून विकासाच्या बाबतीत प्राधान्य देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी संतोष हंबीरे, राजाभाऊ वैद्य व शीला उंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार बिभीषन लोकरे यांनी मानले.

 
Top