Views



*राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचे
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन*



उस्मानाबाद/प्रतिनिधी  

 यापूर्वी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमा यशस्वी पार पडल्या आहेत .याही वेळी ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिलरी कार्यालयात आज पल्स पोलिओ लसीकरणाची पूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते . 
या लसीकरणाची माहिती जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ . के .के. मिटकरी यांनी दिली . ते म्हणाले रविवार , दि.23 जानेवारी 2022 रोजी जिल्हयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे . त्यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हयात एकूण एक लाख 70 हजार 446 इतके 5 वर्षाच्या आतील बालके आहेत . त्यासाठी ग्रामीण भागात एक हजार 198 आणि शहरी भागात 122 लसीकरण बुथची सोय करण्यात आली आहे.लसीची मात्रा देण्यासाठी 3 हजार 337 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत . पर्यवेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी ,जिल्हास्तरीय पर्यवेक्षक तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन,बाजार,विट भट्टया, साखर कारखाने, यात्रा, लग्न समारंभ या ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.भटक्या वसाहती आणि ऊस तोड कामगारांच्या वसाहतीतील बालकांना लस पाजण्यासाठी मोबाईल टिम सोय करण्यात आली आहे.
 या मध्ये मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी मोहिमेच्या कालावधीत शून्य ते पाच वयोगटातील एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच या कोविड-19 लसीकरणाच्या कामावर काही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन कृती नियोजन राबवावे मोहिम यशस्वी करावी . तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणही त्याच गतीने पूर्ण करण्यात यावे , असे सागितले.
 ही मोहिम यशस्वी करण्यासाठी पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ लस पाजून घेण्यात यावी व ग्रामस्तरावर शालेय विद्यार्थ्याच्या प्रभात फेरी काढण्यात येऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे बाबत माहिती देण्यात यावी आणि मोहिम 100 टक्के यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी यावेळी केले . यावेळी अप्पर जिल्हाधिकरी रुपाली अवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, डॉ.इस्माईल मुल्ला, डॉ.एस .एम.काटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) बी एच निपाणीकर, आय.एम.ए.अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, निमा संघटना अध्यक्ष डॉ.गोविंद पाकले, अध्यक्ष रोटरी क्लब, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि गाझी हायस्कूल या शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांचे अधिष्टता यांचे प्रतिनिधी, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे प्रतिनिधी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्या अधिकारी डॉ.के. के .मिटकरी , सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.अन्सारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एम.आर. पांचाळ, जिल्हा क्षयरोग कार्यालय अधिकारी डॉ.होळे, सहा.संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे डॉ.घोगरे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर, युनिसेफ कन्सलटंट डॉ.उज्वला कळंबे, सांख्यिकी पर्यवेक्षक एच.के.पवार तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top