Views





*जापनीज मेंदुज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहीम यशस्वी करावी- कौस्तुभ दिवेगावकर*
                              

           
उस्मानाबाद/प्रतिनिधी

जिल्ह्यात दि.03 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत जे.ई. (जापनीज मेंदुज्वर) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले. जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे.ई. (Japanese Encephalitis) लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते .
          जे.ई.( Japanese Encephalitis) या आजाराबाबत माहिती देताना जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी सांगितले की, जपानी मेंदुज्वर हा विषाणुजन्य आजार आहे. तो क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासांमुळे पसरतो. या आजाराच्या लक्षण म्हणजे सुरुवातीच्या काळात हुडहुडी भरुन ताप, डोकेदुखी, अंगदुखी या शिवाय रुग्ण बेशुध्द अवस्थेत जावू शकतो. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार, भावनिक परिणाम आणि अपंगत्व अशा प्रकारचे परिणाम होवू शकतात. या आजाराच्या नियंत्रणासाठी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, डासांमार्फत होणारा प्रसार रोखण्यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करणे या बरोबरच लसीकरण अत्यंत प्रभावी ठरते. यासाठी वय वर्ष 1 ते 15 वयोगटातील सर्व बालकांना जे.ई. लस देवून संरक्षित करणे हा रामबाण उपाय आहे. जिल्ह्यात दि.03 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत 1 ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना जे.ई. लस देण्याची मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. 
          या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 1 ते 15 वर्ष वयोगटातील एकूण 3 लाख 67 हजार 977 अपेक्षित बालकांना शाळेमध्ये आणि अंगणवाडी स्तरावर लसीकरण सत्रांचे आयोजन करुन जे.ई.लस देण्यात येणार आहे. ही मोहीम आरोग्य विभाग शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना, स्वयंसेवी संघटना यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशाताई यांच्या प्रत्यक्ष सहभागानेच पूर्ण होईल. आजच्या या बैठकीस जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनाही मार्गदर्शन केल. श्री . गुप्ता म्हणाले बालकांची यादी अद्ययावत करावी आणि लसीकरण सत्र आयोजित करण्यासाठी संबधित विभागांनीआवश्यक ते सर्व सहकार्य करावे.

ही मोहीम राबविताना कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कामात देखील सातत्य राखण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
             ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोहीम 100 टक्के यशस्वी करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी केले . यावेळी अप्पर जिल्हाधिकरी रुपाली अवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, डॉ.इस्माईल मुल्ला, डॉ.एस .एम.काटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) बी एच निपाणीकर, आय.एम.ए.अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, निमा संघटना अध्यक्ष डॉ.गोविंद पाकले, अध्यक्ष रोटरी क्लब, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि गाझी हायस्कूल या शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांचे अधिष्टता यांचे प्रतिनिधी, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे प्रतिनिधी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्‍य अधिकारी डॉ.के. के .मिटकरी , सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.अन्सारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एम.आर. पांचाळ, जिल्हा क्षयरोग कार्यालय अधिकारी डॉ.होळे, सहा.संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे डॉ.घोगरे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर, युनिसेफ कन्सलटंट डॉ.उज्वला कळंबे, सांख्यिकी पर्यवेक्षक एच.के.पवार तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top