*कृषी कर्ज मित्र होण्यास इच्छुकांनी अर्ज करावेत*
उस्मानाबाद /प्रतिनिधी
शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका आणि पतपेढ्या मार्फत मोठ्या प्रमाणावर कर्जाची आवश्यकता असते. शेतकऱ्यांना सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी 7/12, उतारा पासून ते बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात. यासाठी बराच कालावधी लागतो आणि कधीकधी हंगाम संपूनही जातो. त्याला वेळेवर कर्ज मिळत नाही आणि नाईलाजास्तव त्याला खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना कर्ज मिळविण्याकरिता अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने आणि विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे हा योजनेचा उद्देश आहे. इच्छुक शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी कृषी कर्ज मित्र निवडण्यात येणार आहेत.
कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा परिषद कृषी विषय समिती मार्फत कृषी कर्ज मित्रांची पात्रतेनुसार निवड करण्यात येईल. कृषी कर्ज मित्र कृषी कर्जाची संबंधित कागदपत्रे गोळा करुन शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करुन मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करेल. कृषी कर्ज मित्र हा शेतकरी आणि बँक यांच्यामधील मध्यस्थांच्या भूमिकेऐवजी सहाय्यक आणि सल्लागाराची भूमिका बजावेल.
प्रती प्रकरण सेवाशुल्क अल्प मुदतीचे कर्ज, प्रथमत: पीक कर्ज घेणारा शेतकरी प्रती प्रकरण सेवाशुल्क 150 रुपये, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज. नवीन प्रकरण 250 रुपये, कर्ज प्रकरण नुतणीकरण 200 रुपये. योजना कालावधी 2021-22 आर्थिक वर्षात अल्प , मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी कर्ज मित्राशी संपर्क साधावा आणि ही योजना चालू आर्थिक वर्षात राबवून गरजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे आणि सभापती कृषी आणि पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद दत्ता साळुंके यांनी केले आहे.