Views


*३ मार्चला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम*

 *नागरिकांनी बालकांचे लसीकरण करून सहकार्य करावे---डॉ.ओम्बासे* 




धाराशिव/प्रतिनिधी 

 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत "राष्ट्रीस पल्स पोलिओ लसीकरण मोहिम" ३ मार्च २०२४ रोजी राज्यात सर्वत्र आयोजित करण्यात येणार असुन यावेळी ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांमुलींना या लसीची मात्रा दिली जाणार आहे.
             मोहिमेच्या अनुषंगाने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीत ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमुलींच्या सर्वांगीण विकासासाठी व देश पोलिओमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी बैठक घेण्यात आली.
              आपल्या देशातून पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सन १९९५-९६ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.मागील १३ वर्षापासून भारतात एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही.त्यामुळे मार्च २०१४ मध्ये भारतातुन पोलिओचे समुळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र राष्ट्रीय स्तरावर प्राप्त आहे.
                  जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ३ मार्च २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयात ग्रामीण भागात १२१८ व शहरी भागात १२३ असे एकुण १३४१ लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हयात ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, १स्त्री रुग्णालय,१ जिल्हा रुग्णालय,१ शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व १ शासकिय आयुर्वेद महाविद्यालय कार्यान्वीत आहे.या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ५ वर्षाच्या आतील अपेक्षित १ लाख ६९ हजार ८७० बालकांना त्यांच्या पूर्वीच्या लसीकरण स्थितीचा विचार न करता (नविन जन्म झालेल्या किंवा बाळ आजारी असेल तर वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार) पोलिओ लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत.
                      तसेच यापुढे मागील राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत झालेल्या लसीकरण कार्याचा आढावा घेण्यात आला.स्थलांतरीत होणाऱ्या लोकसंख्येमधील काही बालके पोलिओ लसीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.हीच बाब पोलिओ निर्मुलनाच्या दृष्टीने चिंतेची आहे.याकरीता ही मोहिम यशस्वीरीत्या राबवून एकही बालक पोलिओ लसीपासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.यासाठी मजुर वसाहती, वीटभट्टया,साखर कारखाने,ऊसतोड कामगार वसाहती,फिरते कुटुंबे इ. ज्या भागात वास्तव्यात आहेत.अशा ठिकाणांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करण्यात येणार आहे.अशा सर्व ठिकाणी मोहिमेच्या एक दिवस अगोदर मोबाईल टिमद्वारे लसीकरण केले जाणार आहे.
           मोहिमेचा व्यापक संदेश सर्व लोकांपर्यंत देण्यासाठी पोस्टर्स व बॅनर्स वाटप करण्यात आले आहेत. जिल्हयातील सर्व लाभार्थी बालकांना मोहिमेपूर्वी स्लिप्सचे वाटप करण्यात आले आहेत.मोहिम काळात प्रत्येक प्राथामिक आरोग्य केंद्र स्तरावर वाहनाद्वारे मायकिंगद्वारे संदेश दयावा. वृत्तपत्र,केबल,आकाशवाणीद्वारे मोहिमेस प्रसिध्दी देण्यात यावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांनी सांगितले.
      जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी विविध विभागांना सहकार्य करण्यास सांगितले.यामध्ये अंगणवाडी बूथ असलेले ठिकाणी अंगणवाडी सुरु ठेवावी.कार्यक्षेत्रातील ०-५ वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थीना स्लीप वाटप करण्यासाठी व लस पाजण्यासाठी आणण्याकरीता सहकार्य करावे.शिक्षण विभागांनी २ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी सर्व शाळांमार्फत प्रभातफेरी काढून पोलिओ संदेश देणे.शाळेच्या वर्गखोल्या आवश्यकतेनुसार बुथसाठी उपलब्ध करुन देणे.मोहिम कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्युत पुरवठा खंडीत न करणे व लोडशेडिंग शिथिल करावे अशा सूचना केल्या.नागरिकांना ०-५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लसीची मात्रा बुथवर नेऊन दयावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
                   सभेला प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ईस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी,आय.सी.डी.एस.गीरी,एस. एम.ओ.लातूर डॉ.अमोल गायकवाड, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.परळीकर,शिक्षण विभागातील अधिकारी तसेच वैद्यकिय अधिक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top