Views



*राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण २३२२ प्रकरणे निकाली व १,५४,०६,४४१/- ची वसुली..*

*जिल्हा न्यायाधीश-१ तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती किरण ए.बागे-पाटील यांची माहिती*

कळंब/प्रतिनिधी 

 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी जिल्हा न्यायालय, कळंब या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालतीमध्ये एकुण चार पॅनल तयार करण्यात आलेले होते. पॅनल क्रमांक एक साठी श्री. किरण ए. बागे पाटील, जिल्हा न्यायाधीश-१ कळंब यांनी पॅनल प्रमुख तर अॅड. एस.एम.जाधवर यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले तर पॅनल क्रमांक २ साठी श्री. एन.ए.इंगळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, कळंब यांनी पॅनल प्रमुख तर अॅड आर.बी.दारशेवाड यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले. तर पॅनल क्रमांक ३ साठी श्री. आर. पी. बाठे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब यांनी पॅनल प्रमुख तर अॅड. एस.आर.पवार यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले. तर पॅनल क्रमांक चार साठी श्री. एम. ए. शेख तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब ह्यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर अॅड. एस.आर.बुधवंत यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.

सदरील लोकअदालतीमध्ये चार पॅनलकडील ठेवण्यात आलेल्या एकुण ३४२ दिवाणी प्रकरणांपैकी ७८ दिवाणी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच विविध स्वरुपाच्या एकुण २२६ फौजदारी प्रकरणांपैकी एन. आय. अॅक्ट १३८ ची ९ प्रकरणे मिटविण्यात आली, ज्यामध्ये रक्कम रुपये १८,६४,९१७/- (अक्षरी रुपये अठरा लाख चाैसष्ठ हजार नउशे सतरा) इतक्या रकमेची तडजोड झाली. तसेच फौजदारी प्रकरणामध्ये इतर ११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर गुन्हा कबुलीच्या एकुण २० प्रकरणांपैकी १५ प्रकरणामध्ये रक्कम रुपये ६,८००/- (अक्षरी रुपये सहा हजार आठशे) इतकी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे सदरील लोकअदालतीच्या दिवशी विविध बॅंका, ग्रामपंचायती, नगर परिषद, पतसंस्था अशा इतर कार्यालयांमार्फत एकुण ४७८४ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणे सादर करण्यात आलेली होती, त्यापैकी बॅंकेच्या एकुण 19 दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये बॅंक यांचेमार्फत लोकअदालती दिवशी एकुण रक्कम रुपये २६,१९,५००/- (अक्षरी रुपये सव्वीस लाख एकोनिस हजार पाचशे सव्वीस) इतकी रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे लोकअदालतीच्या अनुषंगाने नगर परिषद कळंब यांचे वतीने एकुण २८ प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १०,२०,५८२/- (अक्षरी रुपये दहा लाख विस हजार पाचशे ब्याएैशी ) इतकी रक्कम नगर परिषद स्तरावर वसुल करण्यात आली. कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या एकुण २१५८ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये संबंधित ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत स्तरावर एकुण रक्कम रुपये ३५,८९,५९६/- (अक्षरी रुपये पस्तीस लाख एकोनव्वद हजार पाचशे शहाएैशी) इतकी रक्कम लोकअदालतीच्या माध्यमातून वसुल करण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ श्री किरण ए. बागे पाटील यांनी दिली. सदरील राष्ट्रीय लोकअदालत पार पाडण्यासाठी कळंब विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. डी.एस.पवार व विधीज्ञ मंडळातील सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय लोकअदालत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस प्रशासन यांनी परिश्रम घेतले.

 
Top