*परंडा येथील न्यायालयाचे उद्या उद्घाटन*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा उद्घाटन समारंभ रविवारी (दि. १९) उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती अरुण रामनाथ पेडणेकर यांच्या हस्ते तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शंकरराव शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र व गोवा बार आशोशिएशनचे अॅड. मिलींद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत. तर दुपारच्या सत्रात अॅड. सुधाकर आव्हाड यांचे हिंदू वारसा कायदा विषयावर तर अॅड. संग्राम देसाई यांचे भ्रष्टाचार कायदा या विषयावर व्याख्यान होणार आहे.
सन २०२० नंतर नोंदणी झालेल्या वकीलांना कायदा पुस्तीकांचे वितरण महाराष्ट्र व गोवा बार आशोशिएशन च्या वतीने करण्यात येणार आहे. या न्यायालयामुळे न्यायालयीन कामकाज गतीमान होऊन पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळून गैरसोय थांबण्यास मदत होईल. विशेष म्हणजे परंडा विधानसभा मतदार संघात २ ठिकाणी परंडा व भूम अशा लहान तालुक्यात असे न्यायालय स्थापन होण्याची बहुधा महाराष्ट्रातील एकमेव घटना आहे. या समारंभासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा न्यायाधिश १ परंडा विश्वास गणपत - मोहिते व परंडा विधीज्ञ मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.