Views


*राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण ७६३ प्रकरणे निकाली...*कळंब/प्रतिनिधी 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब याठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालतीमध्ये एकुण तीन पॅनल तयार करण्यात आलेले होते. पॅनल क्रमांक एक साठी श्री. आर. पी. बाठे दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब यांनी पॅनल प्रमुख तर ॲड. श्री. एस. एम. जाधवर यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले. तर पॅनल क्रमांक दोन साठी श्रीमती ए. सी. जोशी मॅडम सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब ह्या पॅनल प्रमुख तर ॲड. श्रीमती डी. ए. कांबळे यांची पॅनल पंच म्हणून नियुक्ती कण्यात आलेली होती. तसेच पॅनल क्रमांक तीन साठी श्री. एम. ए. शेख दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब ह्यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर ॲड. श्री. एस. आर. पवार यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.

सदरील लोकअदालतीमध्ये तिन्ही पॅनलकडील ठेवण्यात आलेल्या एकुण २८५ दिवाणी प्रकरणांपैकी ७४ दिवाणी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच विविध स्वरुपाच्या एकुण ३९४ फौजदारी प्रकरणांपैकी एन. आय. अॅक्ट १३८ ची १० प्रकरणे मिटविण्यात आली, ज्यामध्ये रक्कम रुपये १०,१४,७०२/- (अक्षरी रुपये दहा लाख चौदा हजार सातशे दोन) इतक्या रकमेची तडजोड झाली. तसेच फौजदारी प्रकरणामध्ये इतर १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर गुन्हा कबुलीच्या एकुण ४१ प्रकरणांपैकी १५ प्रकरणामध्ये रक्कम रुपये ५,४००/- (अक्षरी रुपये पाच हजार चारशे) इतकी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे सदरील लोकअदालतीच्या दिवशी विविध बॅंका, ग्रामपंचायती, नगर परिषद, पतसंस्था अशा इतर कार्यालयांमार्फत एकुण २८९६ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणे सादर करण्यात आलेली होती, त्यापैकी बॅंकेच्या एकुण २१ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये भारतीय स्टेट बॅंक यांचेमार्फत लोकअदालती दिवशी एकुण रक्कम रुपये २६,१२,७२६/- (अक्षरी रुपये सव्वीस लाख बारा हजार सातशे सव्वीस) इतकी रक्कम वसुल करण्यात आली.
 त्याचप्रमाणे लोकअदालतीच्या अनुषंगाने नगर परिषद कळंब यांचे वतीने एकुण ६७ प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १९,४७,२०१/- (अक्षरी रुपये एकोणीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे एक) इतकी रक्कम नगर परिषद स्तरावर वसुल करण्यात आली. कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या एकुण ५६० दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये संबंधित ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत स्तरावर एकुण रक्कम रुपये ८,१३,७४६/- (अक्षरी रुपये आठ लाख तेरा हजार सातशे शेचाळीस) इतकी रक्कम तसेच पंचायत समिती कळंब अंतर्गत घरकुल प्रकरणातील एकूण ४ प्रकरणामध्ये रक्कम रुपये ६०,०००/- (अक्षरी रुपये साठ हजार) लोकअदालतीच्या माध्यमातून वसुल करण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री. आर. पी. बाठे यांनी दिली. सदरील राष्ट्रीय लोकअदालत पार पाडण्यासाठी कळंब विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. एस. एम. जाधवर व विधीज्ञ मंडळातील सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय लोकअदालत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने कळंब वाहतूक शाखेचे पोलिस नाईक महादेव मुंढे सह आदी कर्मचारी ने यांनी परिश्रम घेतले.
 
Top