*व्हाईस ऑफ मीडिया बरोबरच व्हाईस ऑफ डेमोक्रॅसी करण्याची वेळ आली आहे - आ. पाटील*
*सकारात्मक बातमीसाठी अडीच लाख रुपयांच्या पुरस्कारांची ऐतिहासिक घोषणा*
*व्हाईस ऑफ मीडियाच्या पत्रकार कार्यशाळेचे थाटात व ऐतिहासिक उद्घाटन*
उस्मानाबाद /प्रतिनिधी
राज्यात व देशात असलेले सरकार पत्रकारांनी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्या बातमीचे सोर्स काय आहेत ? हे सांगण्यास भाग पाडणारा कायदा आणणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्र किंवा देशाच्या इतिहासात सोर्स सांगण्याची गरज नव्हती. हे एक प्रकारे पत्रकारांवर बंधन असून हे मोठे बॅनर असलेल्या वृत्तपत्रांनी मान्य करु अथवा न करु. मात्र लोकशाहीचा आवाज जिवंत ठेवण्यासाठी व्हाईस ऑफ इंडिया बरोबरच व्हाईस डेमोक्रॅसी पण करण्याची वेळ आली असल्याचे ठाम प्रतिपादन आ. कैलास पाटील यांनी पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी दि.२६ जानेवारी रोजी केले.
उस्मानाबाद येथील सांजा रोड लगत असलेल्या बीएसएनएल समोरील आर्यन फंक्शन हॉलमध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकार दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, श्री सिध्दीविनायक उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, धनेश्वरी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, श्री समर्थ मल्टीस्टेटचे अध्यक्ष विवेक घोगरे, समय सारथीचे संपादक संतोष जाधव, बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, अमर चोंदे तालुकाध्यक्ष अमजद सय्यद आदी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, पत्रकारांना मुभा असली पाहिजे. कारण पत्रकारांना काय योग्य अयोग्य हे चांगल्या प्रकारे समजते. तर ग्रामीण भागातील पत्रकारांना जे दिसते ते छापतात व डिजिटल मीडीयाच्या माध्यमातून दाखवितात. तसेच लोकशाहीचा आवाज जिवंत करण्यासाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी व त्यांच्या मुलभूत गरजांना मदत करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे आपल्या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी आपण लोकशाहीचा आवाज होणे गरजेचे आहे. तर व्हाईस ऑफ मीडियाच्या मागे सर्व ज्येष्ठ व तरुणांची टीम असल्यामुळे ती महाराष्ट्राचा आवाज म्हणून महाराष्ट्रभर ओळखली जाईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना, मेडीक्लेम किंवा इतर कोणत्याही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न तर करण्यासह आरोग्य वीमा पॉलिसीसाठी मी कायम आपल्या सोबत असेन असे आश्वासनही त्यांनी दिले.
तर दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे तू देखील पत्रकार आहे की काय असे वाटू लागले आहे. पूर्वी दहावीचा निकाल पेपरमध्ये पहावा लागत होता. आता मोठा बदल झाला असून पत्रकारांची पत्रकारिता समाजाभिमुख झाली असून ती देखील जागृत झालेली आहे. तसेच समाजापुढे विविध विषय मांडणारे पत्रकार निर्माण होत आहेत. मात्र नेता, वकील, पोलीस व पत्रकार झाले की ते क्षेत्र सोडता येत नाही. हे जरी खरी असले तरी बँका या मंडळींना कर्ज देत नाहीत. मात्र बँकींग व पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांमध्ये जगाच्या सगळ्या विषयाला वाचा फोडण्याचे सामर्थ्य आहे. तसेच सतत ती पूर्ण अभ्यास व त्यातून निर्माण झालेली बुद्धी यामुळे पत्रकारिता तयार होत असून सगळे क्षेत्रांना स्थिरता निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वच क्षेत्रात शाश्वत व्यवस्थेची रचना येणे आवश्यक असून पत्रकारांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी विशिष्ट पातळीपर्यंत मदत करू अशी आश्वासन त्यांनी दिले.
तसेच डॉ प्रतापसिंह पाटील महाले की इथून पुढे स्पर्धा खूप आहेत. मात्र ती स्पर्धा हेवे-दाव्यांनी न होता ती मैत्रीपूर्ण सामंजस्यातून झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तर जगात व्हाट्सअप फेसबुक व इंस्टाग्राम आधीच्या माध्यमातून पत्रकारिता वाढले आहे. तसेच ७० टक्के डिजिटल मार्केटिंगमध्ये मल्टिनॅशनल कंपन्या काम करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला पत्रकारांची कार्यशाळा होणे आवश्यक असून पत्रकारांनी देखील अपडेट होणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रिंट मीडियावर जशी विश्वासहर्ता आहे, तशीच डिजिटल मीडियाने देखील विश्वासहर्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संजय पाटील दुधगावकर म्हणाले की, ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे असे सांगत या संघटनेला व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक हुंकार बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन रविंद्र पेठे यांनी व आभार रहीम शेख यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर दुसऱ्या सत्रात पत्रकारांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी संस्थापक संदीप काळे, मराठवाडा अध्यक्ष बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जालींदर धांडे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, चेतन कात्रे, तालुकाध्यक्ष अमजद सय्यद आदींनी पत्रकारांशी संवाद साधत पत्रकारिता क्षेत्रातील समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
सकारात्मक पत्रकारितेसाठी अडीच लाख रुपयांचे पुरस्कार
राज्याध्यक्ष राजा माने म्हणाले की, महाराष्ट्रात नव्हे तर देशात सकारात्मक पत्रकारिता असावी यासाठी ही संघटना निर्माण झाली आहे. पत्रकारितेला नवे वळण देण्याची मला संधी मिळाली असून यावर्षीपासून महाराष्ट्रातील सर्वच माध्यमांतील सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अडीच लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार असल्याची ऐतिहासिक घोषणा त्यांनी केली. तर आजची पत्रकारिता सोपी राहिलेली नाही, हे खरे असले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असणे म्हणजे तो पत्रकार आहे असे नव्हे असे सांगत पुढच्या काळातील पत्रकारिता जबाबदारीची असणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आजपर्यंत बातमी कोणाच्या विरोधात लिहिली तरी त्याचे स्त्रोत सांगण्याची गरज नव्हती. मात्र नवीन कायदा येणार असून त्याची सर्व माहिती देणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी समजून बातमी करण्यासाठी या क्षेत्रात यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पत्रकारांना दिशा देण्यासाठी ही संघटना असून देशातील २३ राज्यांमध्ये या संघटनेचे जाळे पसरलेले आहे. राजकारणात जशा संघटना आहेत, तशा पत्रकारांमध्ये देखील आहेत. मात्र संघटना कितीही असल्या तरी उद्देश एकच आहे. त्यामुळे पत्रकारितेला कॉर्पोरेट क्षेत्रात बदलण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत तर कॉर्पोरेट मॅनेजमेंट पध्दतीने याचे स्वागत करुन पत्रकारांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
चौकट
संस्थापक अध्यक्ष संदीप काळे म्हणाले की, पत्रकारांना डोळ्यांची भाषा ही समाजाची दिशा बदलण्याची करायची आहे. तर धाडस घेऊन जो पुढे येतो तो स्वतःचा नव्हे तर समाजाचा हिरो होतो असे सांगत पत्रकारिता क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हुंकारने हुंकार दिला आहे. या क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढून नवीन काहीतरी निर्माण करायचे आहे असून हा ऐतिहासिक कार्यक्रम असल्याचे सांगितले. तसेच नियम, स्थलांतर व सातत्य व्हावे यासाठी ही संघटना पुढे आली असून ग्रामीण भागातील सगळ्यात महत्त्वाचा कणा असणारा पत्रकार दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सगळी मंडळी पुढे आली पाहिजे असे सांगत खऱ्या अर्थाने लोकशाहीला जीवन ठेवण्याचे काम पत्रकार व पत्रकारिता करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत आपण कृतीशील कार्यक्रम हाती घेत नाही तोपर्यंत लोक आपल्याकडे येणार नाही असे सांगितले. विशेष म्हणजे अजूनही पत्रकारिता चांगली दिवस आहेत. त्यामुळे चांगले काम करा, कोणी कितीही विरोध करु द्या, उत्तम आणि सामाजिक प्रवाहासाठी झोकून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
चौकट
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, एस.ए. सय्यद, कमलाकर कुलकर्णी, अंबादास पोफळे, दिलीप पाठक-नारीकर, दिपक लोंढे, प्रशांत कावरे, शीला उंबरे, अंबादास दानवे, इस्माईल सय्यद, भारतीय डाक विभागाचे व्यवस्थापक चंद्रकांत झेंडे, हुंकार बनसोडे यांचा तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल देविदास पाठक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच अमर चोंदे, वैभव पारवे, चेतन कात्रे, किशोर माळी व तानाजी घोडके यांना व्हाईस ऑफ मीडियाचे प्रतिनिधीक स्वरुपात ओळखपत्र तर कै.अनिल केसकर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पत्रकारांसाठी काढण्यात आलेल्या विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले.