Views
*संभाजी ब्रिगेडच्या वतीने कळंब येथे तानाजी सावंत यांच्या मंत्रीपदावरून हकालपट्टीसाठी निवेदन देऊन त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.*


कळंब/प्रतिनिधी 


     उस्मानाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या शिंदेसेना गटाच्या मेळाव्यात भाषण करताना व प्रसारमाध्यमाशी बोलताना ना. तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आत्मसन्मानाला व स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी अत्यंत खालच्या स्तरावरील भाषा वापरली.सत्तांतर झाल्यानंतर लगेच मराठ्यांना आरक्षणाची खाज कशी काय सुटली ? आणि मराठ्यांच्या कळंब येथील महामोर्चाचा बोलविता धनी कोण ? असे मूर्खपणाचे आणि बेताल वक्तव्य करून सावंत यांनी मराठा समाजाचा घोर अपमान करुन मराठ्यांच्या स्वाभिमानास धक्का पोहोचविला आहे. तसेच ब्राह्मण म्हणून मराठ्यांनी फडणवीसांना हिणविले असले तरीदेखिल मराठ्यांची झोळी फडणवीसांनीच भरली, असे म्हणून मराठा समाज हा आरक्षणाची भीक मागतो आहे असे भासवन्याचा लज्जास्पद प्रयत्न केला आहे. यापूर्वी देखील सावंत यांनी महाराष्ट्राला भीक मागायला लावेन अशी मग्रूरीची भाषा वापरून आपल्या मूर्खपणाचे ओंगळवाणे प्रदर्शन केले होते. मराठा समाज अशा खेकडा प्रवृत्तीच्या संधीसाधूं सावंत यास धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
  मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा यासाठी मागील ३० वर्षांपासून संभाजी ब्रिगेड लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करुन सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
   तानाजी सावंत सारख्या मुजोर आणि सरंजाम मराठा नेत्यांमुळेच मराठयांच्या ओबीसी प्रवर्गात आरक्षण मागणीचा प्रश्न प्रलंबित आहे. तानाजी सावंत यांच्या हिणकस व बेताल वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मूर्ख,मुजोर,सत्तांध आणि बेअक्कल अशा ना.तानाजी सावंत यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तानाजी सावंत यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेधाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शिवश्री अतुल गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी दत्तात्रय कवडे ,आशिष पाटील, सुरेश गायकवाड, मनोज लोमटे पाटील , विकास गडकर पाटील, बालाजी नाईकनवरे,प्रशांत गायकवाड,इमरान मिर्झा, ॲड.सुशीलकुमार लंगडे, दीपक गायकवाड,अशोक कांबळे, दत्तात्रय खापे, रणजित पवार आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top