Views
*शहरात आरक्षणाबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन , कळंबच्या मोर्चासाठी ४८ पोलीस अधिकाऱ्यांसह ५५५ कर्मचारी तैनात!*


कळंब /प्रतिनिधी 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने १ लाख मराठा बांधवाच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने " एक मराठा,लाख मराठा" अशा घोषणा देत जनजागृती करण्यासाठी शनिवार (दि.१७) सकाळी अकरा वाजता भव्य अशी शिस्तबद्धरित्या समाजातील नागरिक,विद्यार्थ्यांची शहरातून रॅली काढण्यात आली." आरक्षण आमच्या हक्काचे,नाही कुणाच्या बापाचे" अशा घोषणांनी कळंब शहर दणाणून गेले होते.
-----
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षण नसल्याने मराठा विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे.शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हालचाली दिसून येत नाही.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ' एकच मिशन ओबीसीमधून मराठा आरक्षण ' अशा प्रकारच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकऱ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे.यासाठी आवश्यकती तयारी सकल मराठा समन्वयक समितीकडून करण्यात आली आहे.शहरात स्वागत कमानी,भगवे झेंडे,वाहन पार्किंग,बाहेरगावून,ग्रामीण भागातून मोर्चासाठी येणाऱ्या समाज बांधवांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढण्यात आली.शहरातील मुख्य बाजार पेठेतून ही रॅली कथले चौक,मुंडे गल्ली, एसबीआय बँक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली.राष्ट्रगीताने रॅली ची सांगता करण्यात आली. आयोजित रॅलीमध्ये व्यापारी, महिला,शेतकरी,विद्यार्थी,वकील,राजकीय पक्षातील कार्यकर्ते,नेते,पत्रकार बांधव, डॉक्टर,सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा समाजातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
---
मोर्चाची आचासंहिता;

मोर्चा शांततेत, निश्चित केलेल्या मार्गानेच निघेल.कोणत्याही पक्ष, संघटना, व्यक्तींच्या विरोधात किवा समर्थन घोषणा दिल्या जाणार नाहीत.सभास्थळी आल्यावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेता, कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळणार नाही. सर्वांना रांगेमध्येच चालावे लागेल. प्रथम विद्यार्थिनी, तद्नंतर महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य जनता व शेवटी राजकीय, संघटनेचे पदाधिकारी राहतील. प्रत्येकास पोलीस, समन्वयक व स्वयंसेवकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागेल. ठराविकच घोषणा, त्यापण केवळ स्वयंसेवक देतील त्यास सर्वांचा प्रतिसाद असेल.मोर्चा सीसीटीव्ही, ड्रोनच्या निगरानीखाली असेल, गैरवर्तन दिसल्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.
           चौकट 
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कळंब पोलिसांनी ४८ वरिष्ठ अधिकारी व ५५५ पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे अशी माहिती कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी दिली आहे . या मोर्चासाठी ४ पोलीस अधीक्षक , १० पोलीस निरीक्षक , ३४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक , ४४२ पुरुष पोलीस कर्मचारी ,११३ महिला पोलीस ,आर .सी . पी .चे ४० जवान , निदर्शन विरोधी पथक , दंगा काबू पथक तसेच १८ पोलीस गाड्या असा एकूण पोलिसांचा आरक्षण मोर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठीअसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे .
 
Top