Views
*नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना -आ.राणाजगजितसिंह पाटील*


लोहारा/प्रतिनिधी

जुलै अखेर झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून मदत व पुनर्विसन विभागाचे उपसचिव श्री संजय धारूरकर यांच्याशी केलेल्या चर्चेच्या अनुषंगाने नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. सोयाबीन पेरणी पासून आजतागायत अनियमित व विलंबाने झालेला पाऊस, गोगलगायीचा प्रादुर्भाव, फेर पेरणी अशा विविध नैसर्गिक संकटाना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातच जुलै महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेत जमिनीचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कोंड, नितळी, जागजी, सुंभा, येवती, येडशी व एरंडगाव येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अनेक शेतात पाणी साचलेले असून पिकांचे पूर्ण नुकसान झालेले दिसून आले. 

     तसेच जिल्ह्यातील इतर काही भागात देखील मुसळधार पाऊस पडल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग चिंतातुर आहे. पावसाबाबत अधिक माहिती घेतली असता, हे निदर्शनास आले आहे की मुसळधार पाऊस पडलेल्या अनेक ठिकाणच्या पर्जन्य मापकामध्ये ६५ मिमी. पेक्षा जास्त पर्जन्याची नोंद झालेली नसल्याने केंद्र / राज्य आपत्ती निवारण निकषां प्रमाणे मदत मिळणे शक्य नाही. या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव श्री संजय धारूरकर यांच्याशी चर्चा केली असून झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याचे ठरले आहे. पर्जन्य मापकावर जरी ६५ मिमी. पाऊस दिसत नसला तरी अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. प्रत्यक्षात मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून नुकसानही त्याच प्रमाणात झाले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता, मदत व पुनर्वसन विभागाच्या उपसचिवांशी चर्चा करून तातडीने स्वतंत्र वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत.

 
Top