उस्मानाबाद/प्रतिनिधी
राखी पौर्णिमेच्या दिवशी तुळजापूरपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सिंदफळ गावात दुर्दैवी घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असल्यानं खून करण्यात आल्याची चर्चा गावात आहे.
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे ६२ वर्षीय व्यक्तीची त्याच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. खून झाला त्यावेळी वृद्ध व्यक्ती झोपली होती. हल्लेखोरानं वृद्धाला आणि एका कुत्र्याला जागीच ठार केलं. सदर हल्ला हा अनैतिक संबंधातून घडल्याची चर्चा सुरू आहे. तर सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सिंदफळ येथील अनिल भोसले यांच्या घरी किसन मनोहर सिद्धगणेश (वय ६२ वर्ष) राहत होते. काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने किसन यांच्यावर मध्यरात्री लोखंडी वस्तूने हल्ला करून निर्घृणपणे त्यांची हत्या केली. मारेकऱ्यांनी कुत्र्यालाही ठार मारलं. आज सकाळी ७च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सदर घटनेची माहिती घर मालक अनिल भोसले यांनी पोलिसांना दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. अनैतिक संबंधातून ही हत्या घडल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले आहे. श्वान पथकाच्या मदतीनं पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.