Views


*बालविवाह  लावून देणाऱ्या पालकांविरुद्ध पंचनामे करून पोलीसात गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर*



उस्मानाबाद/ प्रतिनिधी 


उस्मानाबाद जिल्ह्यात बालविवाह आणि गर्भलिंग निदानाच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी जिल्ह्यात होण्या-या बालविवाहांबाबत कडक पावित्रा घ्या आणि ज्या गावात बालविवाह होतील तेथे जाऊन त्या पालकांविरुद्ध पंचनामे करून पोलीसात गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी महिला व बालविकास विभागाच्या अधिका-यांना आज येथे दिले. कोव्हिड-19 मध्ये विधवा आणि अनाथ झलेल्या एकल महिलांच्या पुनर्वसन आणि दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी  व  संरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक श्री. दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.एस यादव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. व्ही. अंकुश, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी(जि.प) बी.एच निपाणीकर, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव, शिक्षणाधिकारी(मा) गजानन सुसर, जिल्ह्यातील सर्व बाल संरक्षण अधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.
                या बैठकीत जिल्हाधिका-यांनी कोव्हिडमुळे निराधार झालेल्या एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्य आणि जिल्हा परिषद या दोन्ही महिला व बालविकास विभागांना संयुक्तपणे काम करण्याच्या सूचना केल्या. मिशन वात्सल्य समिती मार्फत एकल महिलांसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले की  30 जुलैपर्यंत मिशन वात्सल्यची सर्व कामे करून घ्या. कोव्हिडमुळे जिल्ह्यात 1252 महिला एकल झाले आहेत. त्यांना घरकूल योजना, इंदिरा गांधी  राष्ट्रीय  योजना, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विभागाच्या आणि कृषी विभाच्या  योजना अशा सर्व योजनांचा शंभर टक्के लाभ देण्यासाठी प्रत्येक आधिका-याने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक एकल महिलेला योजनांबद्दल माहिती सांगावी.यासाठी ग्रामीण भागात आशा वर्कर्स आणि शहरी भागांमध्ये आंगणवाडी सेविकांची मदत घ्या.  
यावेळी दोन्ही पालक गमावलेल्या 14 बालकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख आणि पी.एम केअर अंतर्गत 10 लाखांची  मुदतठेव देण्यात आल्याचे श्री. अंकुश यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले. पुढे माहिती देतांना ते म्हणाले,आईच्या मृत्यू झालेल्या 32 आणि वडिलांचा मृत्यू झालेल्या 198 आणि दोन्ही बालक गमावलेल्या 14 असे एकूण 244 बालकांना प्रतिमाह 11 हजार रुपये बालसंगोपनाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तसेच यावेळी पालकांच्या नावे असलेले बॅंकांच्या कर्ज प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली.श्री.दिवेगावकर यांनी बॅंक अधिका-यांना याबाबत लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
              बाल न्याय निधीबाबत चर्चा करतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. सर्व शाळा सूरू झाल्या आहेत. कोव्हिडमध्ये एक किंवा दोन्ही पालक गमावलेले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी  दहा  हजार पर्यंत मदत करता येते, तेंव्हा पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाच हजार, सहावी  ते आठवी च्या विद्यार्थ्यांना सात हजार आणि नववी  ते बारावीतील विद्यार्थ्यांना दहा हजाराची मदत तात्काळ करावी. बालन्याय निधी अंतर्गत जिल्ह्याला 35 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.या अर्थसहाय्यासाठी एकूण 134 अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच संबंधितांना अर्थसहाय्य प्रदान करण्यात येईल असे  श्री. अंकुश यांनी यावेळी सांगितले.
 
Top