Views


*येडाईच्या पावन भूमीत भक्तांचा लोटला जनसागर : दहा-बारा लाख भाविकांनी वेचली चुनखडी*


*सडा, रांगोळ्यांनी रस्ते सजवून भाविकांकडून पालखीचं जोरदार स्वागत : हलगी संबळाच्या कडाक्यात येडेश्वरी देवीच्या पालखीचे प्रस्थान*कळंब/प्रतिनिधी

'आई राजा उदो उदो' चा जयघोष करत हलगी,झांज, संबळ च्या गजरात रविवारी येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेत जुना वेचण्याचा मानाचा कार्यक्रम विधीवत पार पडला. चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेल्या या यात्रा काळात रखरखत्या उन्हातही जवळपास दहा लाखांपेक्षा जास्त भाविकांनी येडाई च्या नगरीत यासाठी हजेरी लावली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे येडाई नगरी भक्तिसगरात न्हाऊन निघाली.
 चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेल्या या यात्रा काळात रखरखत्या उन्हातही जवळपास दहा बारा लाखांपेक्षा जास्त भाविकांनी येडाई च्या नगरीत चुनखडी वेचण्यासाठी हजेरी लावली होती.
महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवी चा यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान पार पडतो. गेली दोन वर्ष कोरोना महामारी मुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. या दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. श्री येडेश्वरी देवीलाच महाराष्ट्रामध्ये येडेश्वरी चे भक्त येडाई या नावानेही संबोधतात. ही यात्रा पाच दिवसाची असून यात्रा उत्सवातील चुना वेचण्याचा प्रमुख व मानाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यानिमित्त शुक्रवारपासूनच येरमाळा येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही देवीचे भक्त येरमाळा नगरीत दाखल होत होते.
आई राजा उदो उदो चा भक्तिभावे जयघोष करत आई येडेश्वरी च्या येरमाळा येथील चैत्र यात्रेसाठी सुमारे दहा लाख भाविकांनी चुन्याचा रानात हजेरी लावली. हर्ष उल्हासात आणि भक्तिभावाने चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या दरम्यान उदो उदो च्या गजरात येडाई मातेच्या पालखीचे आमराईत आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली.भक्तीची ही ओघ आणखीन चार दिवस राहणार आहे.
 येडेश्वरी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या मुख्य दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मुख्य मंदिरातून मातेच्या पालखीचे अमराई कडे प्रस्थान झाले. यावेळी लाखो भाविकांची उपस्थिती होती. मंदिरापासून ते अमराई पर्यंत हलगी, झांज, संबळाच्या तालावर व आई राजा उदो उदो च्या नामघोषाने संपूर्ण येरमाळा नगरी दुमदुमून गेली होती. सकाळी ९: १५ मी गावातील बाजार चौकात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पालखी मार्गावर काढलेल्या रांगोळी वरून मातेच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी गावातील मान्यवर मंडळी बरोबरच नेतेमंडळी यांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर हनुमान मंदिर चौकातून ११:४५ वाजण्याच्या सुमारास पालखीचे चुनखडीच्या रानात आगमन झाले. याठिकाणी असलेल्या येडेश्वरी मातेच्या ठाण असलेल्या ठिकाणी पोहचली. यावेळी पालखी दर्शनासाठी व वेचलेली चुनखडी पालखीवर टाकण्यासाठी लोकांचा लाखोंच्या वर जनसागर लोटला होता. 

*वाहनांच्या लांबच लांब रांगा...*
पारंपारिक कार्यक्रमाला दरवर्षी लाखो भाविक दाखल होतात मात्र नियोजन तोकडे पडते. यात्राकाळात नवखे पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत असतना पालखी दर्शनासाठी आणि चुनखडी वेचण्यासाठी गावात आलेली वाहने व भाविकांची अफाट गर्दी यामुळे बार्शी येरमाळा रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

*मान्यवरांची दर्शनासाठी उपस्थिती...*
धाराशिव मतदार संघाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवाजी आप्पा कापसे, तुळजापूर चे आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी चे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील , देवीचे मानकरी अमोल पाटील, श्रीराज पाटील, सतीश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक रणजित तात्या बारकुल, मा. सरपंच विकास बारकुल, अनिल पवार, महेंद्र कासार, समस्त देवीचे पुजारी, खांदेकरी, व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

*पुलाच्या रखडलेल्या कामामुळे वाहतुकीची कोंडी.....* 
बीड, कळंब, बार्शी , उस्मानाबाद मार्गावर स्वतंत्र बसस्थानक व पार्किंग सोय केली असताना
येरमाळा बार्शी रोडवर सुरू असलेल्या सिद्धार्थ नगर येथे मेघा कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. या रखडलेल्या कामामुळे पोलीस प्रशासना मार्फत करण्यात आलेल्या नियोजनबद्ध व सुव्यवस्थित ट्रॅफिक चे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासनाच्या नियोजनाखाली झालेल्या योग्य अशा वाहतुकीच्या नियोजनाला येरमाळयातील सिद्धार्थनगर येथील पुलाच्या चालू असलेले काम मेघा कंपनीने अजून देखील पूर्ण न केल्यामुळे यात्रेच्या अनुषंगाने गावात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीला काही वेळ अडथळा निर्माण झाला होता. बीड, कळंब, बार्शी , उस्मानाबाद मार्गावर स्वतंत्र बसस्थानक व पार्किंग सोय केली होती. 

*भर उन्हातही हलगीवर धरला ठेका....*
 कोरोणाच्या महामारी मुळे दोन वर्षाच्या कालखंडाच्यां नंतर चैत्र पौर्णिमा यात्रा होत असल्याने भाविकांच्या भक्तीत प्रचंड उत्साह दिसून आला. रखरखत्या भर उन्हातही हलगीच्या तालावर ठेका धरत नाचत, फुगडी खेळून भाविकांनी आपल्या उत्साहाला वाट मोकळी करून दिली.
 
Top