Views





*सौदणा येथे प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा उत्साहात संपन्न*


कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील सौंदणा (अंबा) येथे हनुमंताची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मोठ्या उत्साहात सोमवारी सायंकाळी नायगाव येथील चरणदास मठाचे महंत दिनकर बाबा नायगावकर व गुरूवर्य दत्ता महाराज अंबिरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. 

सौदणा येथे दिनांक 20 मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू असुन या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी सकाळपासूनच ग्रामस्थांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. दोन दिवस यज्ञ, मंत्रोच्चार गणेश महाराज शास्त्री, श्रीनिवास शास्त्री यांच्याकडून पुजापाठ सुरू होते. 

सोमवारी तीन वाजता हनुमंतांचया मुर्तीची रथात गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दारोदार सडा शिंपून, रांगोळी काढून, पुजा करण्यात आली. यावेळी तरूण मोठ्या उत्साहाने लेझीम खेळत होते, लहान मुलींनी रूकमीणीची वेशभूषा करून डोक्यावर तुळशी तसेच पाण्याचे कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. तर महिला फुगडी खेळत होत्या तर अनेक पती पत्नींनी फुगडी मध्ये सहभाग नोंदविला. मिरवणुकीनंतर मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा संपन्न झाला. यावेळी गावातील बाहेरगावी नौकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सर्व ग्रामस्थ आज उपस्थित होते. यानंतर गुरूवर्य दत्ता महाराज अंबिरकर यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले. 


चौकट
कलशारोहन कार्यक्रमात गावाच्या लेकमातांचे योगदान असते यासाठी मुंबई पुणे येथे स्थायिक असलेल्या सह सर्व लेकमातांनी आपल्या कुटुंबासह माहेरी हजेरी लावली. त्यांनी मिरवणूकीत सहभाग नोंदविला व फुगडी खेळण्याचा आनंद पुन्हा एकदा माहेरी घेतला. त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. 

चौकट
भक्ती मार्ग सर्वश्रेष्ठ - ह. भ. प अंबिरकर
आयुष्य मानूस जगत असतो देव त्यास जगवत असतो तर संत हे जगण्याचा मार्ग दाखवत असतात त्यामुळे आयुष्यात देवाची भक्तीच आपल्याला तारु शकते. देव हे दुजाभाव करत नसतात विठ्ठल पुंडलिकासाठी पंढरीत आले असले तरी ते अखंड मानवजातीचे तारणहार आहे. देवाचे दर्शन नाही घडले तरी कलशाचे दर्शन घेतले तरी आपले जीवन पुर्णतवाला जाते. यासह अनेक संतविचार त्यांनी यावेळी मांडले.
 
Top