Views


*कळंब येथील लोकन्यायालयामध्ये एकुण २५१ प्रकरणे निकाली...*


कळंब/प्रतिनिधी


राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १२ मार्च, २०२२ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब याठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालतीमध्ये एकुण तीन पॅनल नियुक्त करण्यात आलेले होते. पॅनल क्रमांक एक साठी श्री. महेश ठोंबरे दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर अॅड. श्री. एस. एस. लोमटे व अॅड. श्री. एम. एम. कोलंगडे यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले. तर पॅनल क्रमांक दोन साठी श्री. महंतेश कुडते सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब हे पॅनल प्रमुख तर अॅड. श्री. एस. एम. जाधवर व अॅड. श्री. एस. पी. गायकवाड यांची पॅनल पंच म्हणून नियुक्ती कण्यात आलेली होती. तसेच पॅनल क्रमांक तीन साठी श्रीमती आर. आर. कुलकर्णी मॅडम दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब ह्यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर अॅड. श्रीमती एस. आर. फाटक व अॅड. श्रीमती ए. जे. पाटील (लोमटे) यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.
 

 सदरील लोकअदालतीमध्ये तिन्ही पॅनलकडील ठेवण्यात आलेल्या एकुण ४६४ दिवाणी प्रकरणांपैकी १५७ दिवाणी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच विविध स्वरुपाच्या एकुण ५९९ फौजदारी प्रकरणांपैकी एन. आय. अॅक्ट १३८ ची ९ प्रकरणे तर इतर १० प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर गुन्हा कबुलीच्या एकुण ६४ प्रकरणांपैकी ३८ प्रकरणामध्ये रक्कम रुपये २९,२००/- (अक्षरी रुपये एकोणतीस हजार दोनशे फक्त) इतकी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे सदरील लोकअदालतीच्या दिवशी विविध बॅंका, ग्रामपंचायती तसेच इतर पतसंस्थांमार्फत एकुण २६२१ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) ची प्रकरणे सादर करण्यात आलेली होती, त्यापैकी बॅंकेच्या एकुण ३४ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये भारतीय स्टेट बॅंक, कॅनरा बॅंक यांचेमार्फत न्यायालयासमोर एकुण रक्कम रुपये २३,४३,०००/- (अक्षरी रुपये तेवीस लाख त्रेचाळीस हजार फक्त) इतकी रक्कम संबंधित बॅंकामार्फत वसुल करण्यात आली. तसेच कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या एकुण ३ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये संबंधित ग्रामपंचायतीमार्फत एकुण रक्कम रुपये २३,६९२/- (अक्षरी रुपये तेवीस हजार सहाशे ब्यान्नव फक्त) वसूल करण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री. महेश ठोंबरे यांनी दिली. त्याचप्रमाणे कळंब विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक व विधीज्ञ मंडळातील सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे सदरील राष्ट्रीय लोकअदालत व्यवस्थितरीत्या पार पडली. सदरील राष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज पार पाडण्यासाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस प्रशासन यांनी परिश्रम घेतले.
 
Top