Views

       
*धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल संस्थांनी अनुदानासाठी अर्ज करावेत-जिल्हा नियोजन समितीचे आवाहन*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी


महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित,विना अनुदानित,कायम विना अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालये,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नगरपालिका,नगरपरिषद आणि अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतंर्गत पात्र शैक्षणिक संस्थांनी शासनास अनुदानाकरिता यादी द्यावयाची आहे.यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत पात्र शाळांची शासनास अनुदानाकरिता शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभागाकडील दि.7 ऑक्टोंबर 2015 च्या शासन निर्णयातील अटी आणि शर्तीनुसार ही योजना 2021-22 या वर्षासाठी जिल्हयात राबविण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत 2021-22 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनीही केले आहे.
     या योजनेंतर्गत 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी कालबध्द कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
       इच्छुक शाळांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दि.18 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटींची पुर्तता करुन अंतिमरित्या पात्र प्रस्ताव शासनास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर केले जातील.नेमूण दिलेल्या वेळापत्रकानुसार उस्मानाबाद जिल्हयातील अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत.विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.याबाबत नोंद घ्यावी,असेही जिल्हा नियोजन अधिकारी यांनी कळविले आहे.
                                     
 
Top