Views




*कळंब येथे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाईची मागणी*
 
कळंब/प्रतिनिधी

टिपू सुलतान यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कळंबमध्ये करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली.
 नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला. मुंबई येथील मालाडमध्ये बांधण्यात आलेल्या मैदानास टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले.

 यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान हे हिंदुद्वेष्टे आहेत, असं वक्तव्य करत नाव देण्याला विरोध केला होता. फडणवीस यांच्या टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून टिपू सुलतान प्रेमी मधून नाराजी व्यक्त होत आहे. 

टिपू सुलतान ब्रिगेडच्यावतीने शुक्रवारी निवेदन देण्यात आले. भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांनी जाणूनबुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजा विरुद्ध लढता-लढता वीर मरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला.  टिपू सुलतान यांच्या बद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला. राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतान यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. 

या सर्वांचा देवेंद्र फडणवीस, भाजप व त्याच्या सहयोगी संघटनांना विसर पडलेला आहे, असं या निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्रातील सर्व सुजाण नागरिक असले कृत्य कधीच खपवून घेणार नाहीत. अशा देश विघातकी कृत्याचा जाहीर निषेध करत फडणवीस यांच्यावर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि राज्यघटनेच्या अवमान केल्याबद्दल, देशात अशांतता व समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

 या निवेदनावर टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अकिब पटेल, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, इम्रान मिर्जा, नितीन वाडे, रफिक शेख, रहीम पठाण, अमजद पठाण, हांजीभाई हन्नूरे,आफताब तांबोळी, शरद जाधव, मुजम्मील पटेल, आवेज हन्नूरे, तबरेज हन्नूरे,आदींचे स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top