Views

 
*कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे “राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे ”*

*आयोजन नोकरी इच्छुक युवक-युवतींसाठी राज्यभरातील रोजगारांची पर्वणी*


         
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
राज्यातील कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन करणे अनिवार्य झाले होते.  त्याचा विपरीत परिणाम उद्योग, व्यवसाय यांच्यावर झाला होता. परंतू, आता राज्यातील उद्योग, व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत किंबहुना काही उद्योग पुन्हा सुरु झालेही आहेत. त्यामुळे रोजगाराच्या पुन:श्च विविध संधी तसेच, विशेषत: कोविडच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.  
            याबाबींचा सर्वंकष विचार करुन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांच्या निर्देशांनुसार राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात या नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, दि.12 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत भव्य “राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे ” आयोजन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  त्या अनुषंगाने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर हा रोजगार मेळावा  प्रसिद्ध  करण्यात आला आहे.
            नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित उद्योग, व्यवसाय या मेळाव्यामधे सहभागी होत आहेत. एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि, हायर ॲप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह लि., फियाट इंडिया प्रा. लि., आरएसबी ट्रान्समिशन इं. प्रा. लि., ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंटस प्रा. लि., इ. सारख्या नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामधील कंपन्या या मेळाव्यात वेगवेगळ्या प्रकारची रिक्त पदे नोंदवत आहेत आणि अजूनही काही चांगल्या आस्थापना यामध्ये सहभाग नोंदविणार आहेत.
सर्वसाधारणपणे नववी  पास  पासून पुढे किंवा दहावी आणि बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्त पदांसह सहभागी होण्यासाठी या आयुक्तालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील साधारणत: किमान 25 हजार रिक्त पदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
            मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छुक युवक-युवतींनी या विभागाच्या  www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेज वरील नोकरी साधक (Job Seeker) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. या नंतर उद्योजक निहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
            इच्छुक आणि ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे यथावकाश कळविण्यात येईल आणि शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
            तरी जिल्हयातील इच्छुक युवक युवतींनी आपला  पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या या सुवर्ण संधीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र  यांनी केले आहे.

 
Top