Views


*आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त*
*समाज कल्याणतर्फे आज कार्यक्रम*

   

उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उद्या दि.3 डिसेंबर 2021 रोजी विविध पुरस्कार व योजनांच्या लाभासंबंधिचा कार्यक्रम जि.प. जिल्हा समाज कल्याण कार्यालयातर्फे आयोजित केला आहे.
        शासकीय,अनुदानित, विना अनुदानित आणि कायम स्वरुपी विना अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृहामधील दिव्यांग मुलां-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींमधील न्युनगंड दूर होवून त्यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन विकसीत व्हावा आणि दिव्यांग व्यक्तीसुध्दा समाजाचा एक उपयुक्त घटक म्हणून पुढे यावा यासाठी दरवर्षी 3 डिसेंबर या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींच्या सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी, निबंध, चित्रकला आणि इतर स्पर्धांचे बक्षिस वितरण तसेच दिव्यांग शाळेतील कर्मचारी, व्यक्ती यांचे भव्य रक्तदान शिबीर, दिव्यांग व्यक्तींना घरकुल वाटप, UID कार्ड वाटप, एस.टी. ओळखपत्र, दिव्यांग कर्मचारी आणि दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या सामाजिक संस्था यांना पुरस्कार वितरण करण्यात येते. दि.3 डिसेंबर 2021 रोजी उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेंट्रल बिल्डींग येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
       या स्पर्धेमध्ये प्रवर्गनिहाय मुकबधीर-102, अस्थिव्यंग-84, मतिमंद-158, अंध-17 असे एकूण 361 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सर्व स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेस गुणांकनानुसार सर्व साधारण विजेतेपद देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच ज्या दिव्यांग व्यक्तींकडे दिव्यांगत्वाचे वैश्विक ओळखपत्र (UID कार्ड) नाही अशा व्यक्तींकरीता वैश्विक ओळखपत्र (UID कार्ड) शिबीराचे आयोजन उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक येथे करण्यात आलेले आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

 
Top