Views


*दोन्ही पालकांचे निधन झालेल्या नऊ मुलांना*
*पालकमंत्र्यांच्या हस्ते मुदतठेव प्रमाणपत्राचे वाटप*



        
उस्मानाबाद/प्रतिनिधी

 महिला व बाल विकास विभागाच्या दि.07 मे-2021 च्या शासन निर्णयानुसार दि.01 मार्च-2020 किंवा त्यानंतर कोविड-19 संसर्गामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपये रक्कम मुदतठेव म्हणून ठेवण्यास मान्यता दिलेली आहे.त्यानुसार जिल्हयातील नऊ बालकांना मुदतठेव प्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते काल येथे करण्यात आले.
          जिल्हयातील 14 बालकांचे सामायिक बँक खाते संबधित बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त नावे उस्मानाबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत उघडण्यात आले आहे. 14 पैकी नऊ बालकांच्या खात्यावर प्रत्येकी पाच लक्ष मुदतठेव रक्कम ठेवण्यात आली आहे.त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयात कोविड-19 संसर्गामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या नऊ बालकांना पाच लक्ष रुपये मुदतठेव प्रमाणपत्राचे वाटप काल जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री श्री. गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
       या कार्यक्रमास खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार सर्वश्री कैलास पाटील, तानाजी सावंत, राणाजगजितसिंह पाटील, जि.प.च्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक नीवा जैन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.व्ही.अंकुश, तसचे जिल्हयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कोमल धनवडे, बाल संरक्षण अधिकारी प्रज्ञा बनसोडे, श्री .हर्षवर्धन शेलमहोकर यांनी प्रयत्न केले.या बालकांना एकरकमी मुदतठेव म्हणून जमा केलेली पाच लक्ष रक्कम बालकाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आहरीत करण्यात येणार आहे.पाच लक्ष मुदतठेव रक्कम आहरीत करण्यासाठी व मुदतठेव रक्कमेवर व्याज अनुज्ञेय होण्यासाठी मुलगी वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि मुलगा वयाची 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत अविवाहीत असणे आवश्यक आहे.
                                               
 
Top