*सामान्य माणूस हाच कायदा आणि व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे- उपविभागीय पोलिस अधिकारी एम रमेश*
कळंब/प्रतिनिधी
सामान्य माणूस हाच कायदा आणि व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे असे प्रतिपादन कळंब सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी कळंंब येथील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचा योग साधून विविध प्रकारचे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. त्यानुसार शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करियर मार्गदर्शन आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी - महिलांसाठी लैगिंकता प्रतिबंधक कायद्यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या आधुनिक काळात स्पर्धा खूप वाढलेली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असून आत्तापासूनच योग्य तयारी केली, तर निश्चितच हमखास यश मिळू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप ऊर्जा असते. ते निश्चितपणे कठीण परिश्रमाच्या माध्यमातून यश मिळवू शकतात, असे आपल्या स्वानुभवातून अनेक उदाहरणाद्वारे विशद केले. तसेच महिला आणि मुलींसाठी लैंगिकता प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने सखोल मार्गदर्शन केले. कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच अनुषंगाने विविध समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्याद्वारे पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे, आपले कर्तव्य आहे. सामान्य माणूस हाच कायदा आणि व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे.
यावेळी विचारमंचावर शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार, उपप्राचार्य डॉ सतीश लोमटे, पोलीस उपनिरीक्षक मालुसरे ,पतंगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. गोरमाळी, डॉ. एम.बी.जाधव, डॉ. के.डी.जाधव, डॉ. डी एन चिंते, डॉ. एम डी गायकवाड, प्रा. अरविंद खांडके, प्रा. प्रताप शिंदे, प्रा. गणेश आडे आदी तसेच पोलीस प्रशासनातील आणि महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्याची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ.दत्ता साकोळे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. राम दळवे, प्रा. बालाजी वाघमारे, अरविंद शिंदे, चांगदेव खंदारे आदींनी परिश्रम घेतले.