Views
*कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह सहाय्य देण्यासाठी नियंत्रण कक्ष*


 
उस्मानाबाद/प्रतिनिधी


 राज्यातील जी व्यक्ती केावीड -19 या आजारामुळे निधन पावली आहे त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रूपये  (पन्नास हजार रुपये मात्र) इतके  सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाने या अनुदान वाटपाबाबतची कार्यपध्दती निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने  शासन निर्णय दि. 26 नोव्हेंबर 2021 व दि. 08 डिसेंबर 2021 नुसार अनुदान वितरीत करणे आवश्यक असल्याने जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करणे आवश्यक होते. त्यासाठी जिल्हा स्तरावर  नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे जारी केले आहेत. 
या नियंत्रण कक्षाच्या समितीवरील सदस्य असे- जिल्हा नियोजन सूचना व विज्ञान अधिकारी, श्री रुक्मे, तहसीलदार (संगायो) श्रीमती मनिषा मेने,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे, महसूल सहाय्य्क  प्रविण साठे, श्रीमती धाट प्रिया, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक  तानाजी हंगरगेकर, नेटवर्क इंजिनियर कदम आप्पासाहेब.
 राज्य शासनाने कोविड -19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकाने सानुग्रह सहाय्य प्रदान करण्यासाठी विकसित केलेल्या mahacovid19relief.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन केलेला अर्ज  स्वीकृत झाल्यानंतर ‍जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यास सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर अंतिम मंजुरी देईल, असे निर्देश शासनाने दिले आहेत. 
       उस्मानाबाद जिल्हयामध्ये ICMR  पोर्टलवर  दि. 14 डिसेंबर 2021 अखेर कोविड -19 या आजाराने  2080 व्यक्तींचे  निधन झाल्याची नोंद आहे. प्राप्त निर्देशानुसार पोर्टलवर उस्मानाबाद जिल्हयामधून आजअखेर अंदाजे 1500 अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हयातील कोविड 19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकास संपर्क करून त्यांच्याकडून सानुग्रह सहाय्य प्राप्त होण्यासाठी अर्ज भरून घेणे आणि त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत कार्यवाही करणे आवश्यक आहे. 
तालुका स्तरावर समिती :
        जिल्हाधिकारी यांनी  आपत्ती  व्यवस्थापन  कायदा 2005 आणि  साथरोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना तसेच नियामावलीतील तरतुदीअन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार कोवीड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास  50 हजार रंपये सानुग्रह सहाय्य देण्यासाठी अर्ज भरून घेणे आणि त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी तालुकास्तरावर पुढीलप्रमाणे समिती गठीत करीत आहे. अध्यक्ष- तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक, सदस्य असे- 1) वैद्यकीय अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय, 2) तालुका आरोग्य अधिकारी, 3) मुख्याधिकारी नगर परिषद/नगरपंचायत, 4) गटविकास अधिकारी.
 या समितीने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. समितीने तालुक्यातील ICMR  पोर्टलवर कोवीड 19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या यादीनुसार गावांची विभागणी करून समिती सदस्यांना गावे वाटप 

करावेत, समिती सदस्यांनी त्यांच्या विभागामार्फत या गावातील ICMR यादीनुसार मयत व्यक्तींचे निकट नातेवाईकांशी संपर्क साधावा. कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांनी mahacovid19relief.in या पोर्टलवर सानुग्रह सहाय्य प्राप्त  होण्यासाठी  अर्ज भरला आहे किंवा कसे याची खातरजमा करावी. अर्ज भरला नसल्यास पुढील कागदपत्रे/माहितीसह सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून ऑनलाईन अर्ज भरावा. 
अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक  किंवा अधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 खाली मृत्यू प्रमाणपत्र,  इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयंघोषणा पत्र. 
अर्जदाराने अर्ज भरताना निकटच्या नातेवाईकांचे नाहरकत स्वयंघोषणापत्राची संपर्क करणा-या कर्मचा-यांने खातरजमा करावी. अर्जदाराने भरलेल्या अर्जाची अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव, पत्ता, माबाईल क्रमांक तसेच मयत व्यक्तीचे नाव आणि  मृत्यूचा दिनांक इत्यादी बाबतची माहिती इंग्रजी  ( Exel Format ) मध्ये दि.27 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वा.पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. समितीने कोवीड 19 या आजाराने  निधन पावलेल्या व्यक्तींच्या  निकटच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत शासनाने विकसित केलेल्या mahakovid19relief .in या पोर्टलवर आवश्यक कादपत्रांसह ऑनलाईन अर्ज करण्यास तालुका/गाव पातळीवर आवश्यक ती प्रसिध्दी द्यावी. प्रमाणे समितीने आवश्यक साधनसामग्री आणि  अधिनस्त कर्मचारी यांचा यथायोग्य वापर करून नमुण दिलेली जबाबदारी पार पाडावयाची आहे. 


 
Top