Views


*(बाल दिन विशेष)*

* कोरोना काळात वाढलेले बालविवाह रोखले - कुटुंबापासून दुरावलेल्यांची घडविली माता-पित्यांशी भेट*

*उस्मानाबाद चाइल्ड-लाइन चा शेकडो बालकांना मदतीचा हात* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


कोरोनाकाळात जग थांबले, पण चाइल्ड-लाइनचे काम अविरत सुरूच राहिले. एका फोनवरून, मिळालेल्या माहितीच्या आधारे उस्मानाबाद चाइल्ड-लाइनच्या टीमने मिशन मोडवर काम करून तात्काळ हरवलेल्या मुला - मुलींना आश्रय दिला. तर कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले बालविवाह रोखण्यातही यश मिळविले. उस्मानाबाद चाइल्ड-लाइनचे संचालक डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर शेकडो बालकांना मदतीचा हात मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनाथ, निराधार बालके, बालमजूर, बालगुन्हेगार, अन्याय, अत्याचारपीडित, विधीसंघर्षग्रस्त बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी चाइल्ड-लाइन (1098) कार्यरत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणि तीर्थक्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह आंधप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यामधील नागरिक मोठ्या संख्येने येतात. गर्दीच्या काळात बालके कुटुंबीयापासून दुरावण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशावेळी चाइल्ड-लाइनचे पथक तात्काळ दाखल होऊन त्या बालकास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आहे. उस्मानाबाद चाइल्ड-लाइनमार्फत आजपर्यंत शेकडो बालकांना आधार देऊन त्यांना परत कुटुंबीयापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. बालविवाह, बालमजुरी रोखण्यासाठी विविध उपक्रम, समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती असे उपक्रम नियमित राबवले जातात. कोरोना काळात बाल विवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. कमी खर्चात विवाह सोहळे उरकले जात असल्यामुळे अनेक पालक अल्पवयीन मुलीला बोहल्यावर चढविण्याचे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळून आले. परंतु चाइल्ड-लाइनच्या टीमने वेळीच असे प्रकार रोखून मुलीच्या आई-वडीलांसह दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन करून बाल विवाहामुळे होणार्‍या दुष्परिणामाची जाणीव करून दिली. मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशी हमी घ़ेऊन पालकांना समज देण्याचे कार्य चाइल्ड-लाइनने केले. त्यामुळे कोरोना काळात अनेक बालविवाह रोखण्यात यश मिळाले. कौटुंबिक कलहामुळे, कुटुंबासोबत प्रवास करताना दुरावलेले तर कधी गतिमंद असल्याने चालत-चालत इतर जिल्ह्यांमधून उस्मानाबाद जिल्ह्यात पोहचलेल्या बालकांना चाइल्ड-लाइनने वेळीच आधार दिला. चाइल्ड-लाइनने अनेक गतिमंद मुलींना खातरजमा करून परत पालकांच्या स्वाधीन केले आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यात बालकांवरील अत्याचाराच्या अनेक घटनाही समोर आल्या. अशा पीडितेसह कुटुंबाचे समुपदेशन करून त्यांना आधार देण्यासाठी चाइल्ड-लाइनची टीम तत्पर राहिली.
-----------------------------------------------------------------
*घरात अडकलेल्या बालकांना मानसिक आधार*
गेल्या पावणेदोन वर्षात शाळा बंद असल्यामुळे मुले घरातच राहिली. घराबाहेर जाता येत नसल्यामुळे आणि खेळण्याबागडण्यावर निर्बंध आल्यामुळे बालकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. घरातच कोंडून रहावे लागल असल्याने चिडचिडेपणा, वैफल्यग्रस्त झालेल्या बालकांची समजूत काढताना पालकही चिंताग्रस्त बनले होते. या काळात चाइल्ड-लाइनने 1098 या टोल फ्री क्रमांकाद्वारे बालकांचे समुपदेशन करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. तसेच कोरोनामुळे जे बालक अनाथ झाले अशांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
-----------------------------------------------------------------
*टोल फ्री क्रमांकाबाबत सातत्याने जनजागृती*
कधी गृहकलहामुळे इतर जिल्ह्यातील बालके कुटुंबापासून दूर निघून येतात. अशा बालकांना वेळीच मदत मिळावी याकरिता उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये चाइल्ड - लाइन मार्फत बालक आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात 1098 या टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. सर्व शाळांमधील मुला-मुलींना हा क्रमांक अवगत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात बाहेरून देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक पथक सतत सक्रिय राहिले. त्यामुळेच कुठेही निराधार अवस्थेतील बालक असो, बालविवाह असो अथवा अत्याचारपीडित बालक. चाइल्ड-लाइनला नागरिकांकडून तात्काळ संपर्क साधला जातो. उस्मानाबाद चाइल्ड-लाइनमार्फत विधि संघर्षग्रस्त, हरवलेेले,सापडलेले, वैद्यकीय सेवेची गरज असणारे, कलहामुळे बाधीत झालेले, निवार्‍याची गरज असलेले, शिक्षणाची गरज असणारे, बालविवाह, बालकामगार, बालमजूर, लैंगिक शोषित बालकांविषयी माहिती मिळताच चाइल्ड - लाइनची टीम उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी वेळीच हजर होऊन तात्काळ मदतीचा हात देण्यासाठी तत्पर आहे. बाल कल्याण समिती, स्थानिक पोलीस आणि जागरूक नागरिकांचे या कार्यात नेहमीच सहकार्य मिळत आहे -- डॉ. दिग्गज दापके-देशमुख संचालक, चाइल्ड - लाइन उस्मानाबाद
 
Top