Views


*भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जि.प.प्रा.शा. हासेगाव (केज) येथे बालदिन उत्साहात साजरा*


कळंब/प्रतिनिधी

 तालुक्यातील मौजे हासेगाव (केज) या ठिकाणी बालदिनाचे औचित्य साधून ''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) चा समारोप करताना महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विधीज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ नोव्हेंबर, २०२१ रोजी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थी व नागरिकांसाठी कायदेशीर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब श्री. महेश ठोंबरे यांनी विधी सेवा प्राधिकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत विविध कायदेविषयक बाबींवर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२१ ते दिनांक १४ नोव्हेंबर, २०२१ दरम्यान आयोजित केलेल्या भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी संपन्न झालेल्या जागरूकता शिबिरातून तसेच डोअर टू डोअर कायदेविषयक जनजागृतीच्या माध्यमातून विविध योजनांची तसेच कायदेशीर बाबींची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचे सांगितले.
सदरील कार्यक्रमामध्ये अॅड. प्रविण यादव यांनी बालकांचे हक्क व मोफत शिक्षणाचा अधिकार याविषयी महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. तसेच जेष्ठ विधीज्ञ अॅड. टी. बी. मनगिरे यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम या उपक्रमाचे कौतुक केले. तर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. मंदार मुळीक यांनी सर्वांच्या एकजुटीमुळे व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यास मदत झाली असे नमूद करून या कार्यक्रमामुळे निश्चितच सर्व सामान्यांना फायदा झाल्याचे सांगितले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन जि.प. शाळेचे सहशिक्षक अमोल बाभळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक आर. के. गुंजाळ सर यांनी केले. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब श्री. महेश ठोंबरे हे होते. तसेच कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी मधुकर तोडकर, कळंब पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार साहेब, विधिज्ञ मंडळ कळंबचे अध्यक्ष अॅड श्री. मंदार मुळीक, जेष्ठ विधीज्ञ अॅड. टी. बी. मनगिरे, अॅड. प्रविण यादव, अॅड. एस. आर. आगलावे, अॅड. नलावडे, मुख्याध्यापक जगदाळे सर, प्रशांत घुटे सर तसेच कळंब न्यायालयातील कनिष्ठ लिपिक इरफान मुल्ला, शिपाई संतोष भांडे, सावनकुमार धामनगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी मौजे हासेगाव (केज) येथील ग्रामस्थ व जि. प. शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामसेवक लांडगे, मुख्याध्यापक जगदाळे सर, सहशिक्षक अमोल बाभळे, प्रशांत घुटे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top