Views


*पैगंबर मोहम्मद बिल लागू करून मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे -- वंचित बहुजन आघाडी लोहारा तालुका*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


पैगंबर मोहम्मद बिल लागू करून मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने दि.22 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मार्फत दिले आहे.
 या निवेदन म्हटले आहे की, मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन आहे. त्यातच धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे बंधुतेच्या मूल्यांचे हनन होवू नये म्हणून "पैंगंबर मोहम्मद बिल" गेल्या अधिवेशनात वंचित बहुजन आघाडी तर्फे विधानपरिषद सदस्य आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून मांडण्यात आले. मात्र शासनाने अजून या संबंधी काहीच कृती केली नाही. वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केलेले पैगंबर महम्मद, बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा, न्यायालयाने मान्यता दिलेले पाच टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करावे, महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकतीमध्ये वाढ करुन इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे, संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह.भ.प.कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे, वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा, सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रविकिरण बनसोडे, मेजर वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top