Views







*'....आणि वर्ग मित्रांच्या आठवणींनी 'योगेश्वरी' ची पवित्र भूमी 'नाव्हून' निघाली, योगेश्वरी -१९८९' चे 'गेट-टुगेदर' अविस्मरणीय ठरले; वर्षभर ऊर्जा मिळणार.*


कळंब/प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यापासून प्रचंड आतुरता... त्या क्षणाची पाहिली जाणारी वाट... आणि अवघ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रामधून आपल्या दैनंदिन जीवन जगताना बालमित्रांच्या आठवणींचा घेतलेला ध्यास... अखेर रविवार ता.७ नोव्हेंबर च्या सकाळी उत्स्फूर्त गळाभेटीने आणि सुगंधी वातावरणात पुर्णत्वास आला.

योगेश्वरी शिक्षण संस्थेतील 'योगेश्वरी- १९८९' च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर उत्स्फूर्त कार्यक्रम काल रविवारी अत्यंत हृदयस्पर्शी, अवर्णनीय आणि आनंदी वातावरणात दिवसभर चालला.

रविवारी सकाळी वेगवेगळ्या भागातून आलेल्या वर्गमित्रांनी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्नेहमिलनाला यथोचित प्रारंभ झाला. यानंतर गोटे गुरुजी सभागृहात आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या 'त्या' काळातील गुरुजनांच्या उपस्थित प्रथम सत्राला सुरुवात झाली.

यावेळी आदरणीय गुरुजनांचा दहावी बैच च्या विद्यार्थ्यांनी सत्कार केला; तसेच शिवकुमार निर्मळे गुरुजींनी तयार केलेल्या सन्मान पत्राचे ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना पोटभरे गुरुजी म्हणाले, योगेश्वरी ही त्यागाची माती आहे. तुमचे हे उपक्रम आम्हाला ऊर्जा देतील. तुम्ही अकाली म्हातारपण येऊ देऊ नका, दिवसा झोपू नका.. असा सल्ला त्यांनी दिला. तर लंकेश वैद्य सरांनी संकट काळात एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना बालाजी मुंडे गुरुजींनी त्यांच्या या माजी विद्यार्थ्यांना हृदयस्पर्शी संवादाने अक्षरशः तासभर खिळवत ठेवले!

बालाजी मुंडे म्हणाले, हा हृदय स्पर्शी कार्यक्रम आपण आयोजित केला यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असा आहे. श्रोता म्हणून आलो आणि मार्गदर्शक झालो! ही तुमची कृपा आहे.आम्ही फक्त मार्ग दाखवला, ज्यांनी स्वीकारला ते यशस्वी झाले. शिक्षका सारखा दुसरा पेशा नाही. महाराष्ट्रात आंबेजोगाई हे पवित्र, अद्वितीय शहर असल्याचा उच्चार करताच प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रतिसाद मिळाला. नैतिक कर्तव्य पार पाडता आले पाहिजे, काळा बरोबर बदलण्यात यश असते. तुमचे आई-वडील हे सर्व प्रथम गुरू आहेत, असे सांगून या कार्यक्रमाने आमचे आयुष्य वाढेल..!' असे ते म्हणाले. आई, वडील, शिक्षक आणि वातावरणाची जाणीव ठेवा. आई-वडिलांची सदैव सेवा करा. दिसणे वेगळे आणि असणे वेगळे. क्षेत्र कोणतेही असो; त्यात स्किल असु द्या..! असा गुरु संदेश देत त्यांनी सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना देत भविष्यातील यशदायी आनंदासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

या बहारदार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी केले. प्रस्तावित संतोष मोहिते तर आभार गोविंद कदम यांनी मानले.यानंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात धनराज काळे फार्म हाऊस येथे गुलाब पुष्पांच्या सुगंधी सोबतीने रोमांचकारी झाली!

सुराणा चा संदीप अध्यक्ष असलेल्या या परिचय कार्यक्रमातून सर्वांनी आपल्या आठवणी सांगत हास्यकल्लोळात गुंग होऊन मनमुराद आनंद लुटला.
आनंद,अमोल, श्रीकांत, बिबीशन, अनिल, संतोष, नरेंद्र, मोईन,मंग्या (मंगेश यादव,कळंब) यासारख्या बाल वर्गमित्रांनी आपल्या परिचयातून बालपणीच्या खोड्या,समस्या, सतावणाऱ्या मित्रांची यादी आणि गमती- जमती ना उत्स्फूर्त उजाळा दिला... यावेळी ही वर्ग मित्रांची मांदियाळी 'जाम' (खेड) खूष झाली!!

नेत्रदान संकल्प आणि पत संस्थेची उभारणी

योगेश्वरी 89 ग्रुपचे संस्थापक संतोष मोहिते यांच्या संकल्पनेतून नेत्रदान करण्याचा संकल्प, भविष्यात सदस्यांच्या हितासाठी पतसंस्था उभारण्याचा मनोदय प्रत्यक्षात येण्याची शक्यता असल्याचे संतोष मोहिते यांनी सांगितले. यावेळी हे सर्व प्रोग्राम यशस्वी करणाऱ्या मित्रांचे विशेष कौतुक वीरेंद्र गावडे यांनी केले.
-----------------------------------
चौकट : 
'मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे स्वीय सहाय्यक डॉ. श्रीकांत पंडित ठरले मुख्य आकर्षण!'

'योगेश्वरी-१९८९'च्या बॅचचा दहावीचा विद्यार्थी आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे स्वीय सहाय्यक डॉ. श्रीकांत पंडित हे आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. त्यांच्यासोबत प्रत्येक जणांनी काढलेली सेल्फी, फोटोसेशन.. आयुष्यभर संस्मरणीय ठरेल, यात शंका नाही! त्यांचा स्वभाव, दिलदारपणा,साधेपणा त्यांनी दिलेला वेळ, हा तमाम वर्ग मित्रांना आनंदाची पर्वणी ठरला.



चौकट: 
समारोप सत्रात आठवणींच्या भावविश्वात आनंदाश्रूंनी वाट मोकळी केली..

फार्म हाऊस वरील तिसऱ्या सत्रात मनमुराद स्नेहभोजन सर्वांच्या साक्षीने घेताना सर्वांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू थबकले. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे सवंगडी पुढच्या वर्षीच्या लातूर येथील गेट-टुगेदर चा आशेने पुन्हा अखेर मार्गस्थ झाली, पुन्हा एकत्र येण्याच्या ओढीने...!!



 
Top