Views
*अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या. नराधामास फाशीची शिक्षा देण्याची भारतीय जनता महिला मोर्चा उस्मानाबाद यांच्या वतीने मागणी*

उस्मानाबाद,/इकबाल मुल्ला

परांडा येथील अल्पवयीन मुलीवरील झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता महिला, युवती व युवा मोर्चा उस्मानाबाद यांच्या वतीने पोलिस अधीक्षक नीवा जैन मॅडमला व जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. टाकळी, तालुका परंडा येथील एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्याच्याच नव्हे तर पुरोगामी म्हणून नावलौकिक असणाऱ्या संबंध महाराष्ट्राच्या तोंडाला काळीमा फासणारी घटना आहे. अशा घटना प्रचंड वाढल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अक्षरशः ऐरणीवर आला आहे. तिघाडी सरकार अजूनही राज्य महिला आयोग अध्यक्ष नेमण्यासाठी अनिच्छुक दिसत आहे. महिलांवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. समाजातील विकृती जर अशीच वाढत राहिली तर येणाऱ्या काळात कुठलीही आई मुलीला जन्माला घालण्याअगोदर 10 वेळा विचार करेल. अशा घटना वाढत चालल्यामुळे मुलींचा जन्मदर सुद्धा कमी होत चाललेला आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही एक चिंतेची बाब आहे. राज्यसरकारने कायदा कठोर करुन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी कठोर करणे गरजेचे आहे तरच असे कुकर्म करताना समोरचा हजारवेळा विचार करेल असे मत भारतीय जनता महिला मोर्चाच्या अर्चना अंबुरे यांनी व्यक्त केले. ही घटना झाल्याचे समजताच परंडा पोलिस पथकाने संबंधित नराधामास अटक केली असली तरी सुद्धा घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर आरोपीची सखोल चौकशी करुन त्यास कठोर शिक्षेची कार्यवाही करण्यात यावी व बाल लैंगिक शोषण कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयात घेवून संबंधित नराधामास फाशीची शिक्षा द्यावी. तसेच या घटनेचा निपक्षपातीपणे तपास करुन पीडित कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. या घटनेमागे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचीही चौकशी करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भारतीय जनता महिला मोर्चाच्या अर्चनाताई अंबुरे, जिल्हा उपाध्यक्ष विद्या माने, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हासरचिटणीस जोशीलाताई लोमटे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष पुजा देडे, युवती जिल्हाध्यक्ष पुजा राठोड आणि युवा मोर्चा सरचिटणीस देवकन्या गाडे आदी उपस्थित होत्या.
 
Top