*विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर रांगोळीतून साकारला
रावण वधाचा देखावा! धारासूरमर्दिनी मंदिरातील
भव्यदिव्य रांगोळी वेधतेय भाविकांचे लक्ष*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील धारासूरमर्दिनी मंदिरात रावण वधाचा देखावा रांगोळीतून साकारला आहे. कलायोगी आर्टस्चे राजकुमार कुंभार यांनी रेखाटलेली ही भव्यदिव्य रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. नवरात्र कालावधीत कुंभार यांनी कर्तृत्त्वान महिलांना मानवंदना देणारी रांगोळी तीन दिवसांपूर्वीच रेखाटली होती. त्यानंतर विजयादशमीच्या निमित्ताने राजकुमार कुंभार यांनी पुन्हा रावण वधाचा देखावा रांगोळीतून साकारला आहे. ही रांगोळी देखील 340 चौरस फुटाची असून प्रभु श्रीरामचंद्र रावणाचा धनुष्यबाणाने वेध घेताना रेखाटलेले आहेत. शुक्रवारी विजयादशमी दिवशी देवीदर्शनास येणार्या भाविकांसाठी ही रांगोळी खास आकर्षण ठरली आहे. मंदिर समितीच्या वतीने कुंभार यांचा सत्कार धारासूरमर्दिनी मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून नारीशक्तीचा संदेश देणारे तसेच विजयादशमीच्या निमित्ताने भव्यदिव्य रांगोळी साकारल्याबद्दल कलायोगी आर्टस्चे राजकुमार कुंभार यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने श्रीकांत डोके, बाळासाहेब यादव यांनी शाल, श्रीफळ देऊन कुंभार यांचा सत्कार केला. यावेळी शैलेश कदम, आदर्श साळुंके आदी उपस्थित होते.