Views




*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात १४९१ उद्योग / व्यवसाय सुरु करण्याचा संकल्प --आ. राणाजगजितसिंह पाटील* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


१७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसाचे व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्यातील १४९१ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार उद्योग / व्यवसाय सुरु करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला आहे. कोविडची महामारी व त्यामुळे उद्भवलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पुढाकार घेत देशातील जवळपास ८० कोटीहून अधिक जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत दर महा ५ किलो मोफत धान्य देण्याचे अभियान राबविले. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरु करण्यात आलेली हि योजना पुढे दुसऱ्या लाटेतही कायम ठेवून येणारी दिवाळी म्हणजे नोव्हेंबर, २०२१ पर्यंत राबविण्याची घोषणा केली आहे. तसेच 'आत्मनिर्भर भारत' ही केवळ घोषणाच न करता अनेक योजना जाहीर करत त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. सहसा वित्तीय संस्था कर्ज देण्यास टाळाटाळ करतात परंतु केंद्र सरकारच्या नवीन धोरणांमुळे योग्य प्रस्ताव आल्यास कर्ज पुरवठा करणे अनिवार्य झाले आहे व याला अनुदानाची जोड देण्यात आली आहे. काल दिनांक १२ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र व बूथ प्रमुख यांच्या ऑडिओब्रिजद्वारे झालेल्या बैठकीत मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक बूथ मधील किमान एका नागरिकाला त्यांच्या गरजे व इच्छेनुसार उद्योग / व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे ठरले आहे. प्रधानमंत्री स्वनिधी, ई-मुद्रा, कृषी वर आधारित उद्योग, MSME, DIC मार्फत चालविण्यात येणारे उद्योग, तसेच छोटे-मोठे व्यवसाय व उद्योग सुरु करण्यासाठी अथवा सुरु उद्योगांमध्ये वृद्धी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना या योजनांच्या माध्यमातून ५% ते ६०% पर्यंतचे अनुदान उपलब्ध आहेत. तसेच बँकांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित बूथ प्रमुख क्रियाशील राहतील. या संकल्पासह मोफत धान्य वितरण योजना योग्य पद्धतीने राबविली जात आहे का? त्याची खातरजमा करण्याची जबाबदारी देखील बूथ प्रमुखांकडे देण्यात आली आहे. या महत्वपूर्ण अभियानाचा योग्य लाभ घेऊन उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण सुदृढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
 
Top