Views


*उस्मानाबाद 'चाइल्ड-लाइन' च्या टीमने रोखला नळदुर्ग येथे होणारा बालविवाह*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे होणारा बालविवाह चाइल्ड-लाइन उस्मानाबाद च्या टीमने तत्परता दाखवून रोखला आहे. उस्मानाबाद 'चाइल्ड-लाइन' कार्यालयास मिळालेल्या आधारे हा बालविवाह उघडकीस आला असून बालविवाहाची प्रथा आजही सुरू असल्याचे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे. चाइल्ड-लाइन उस्मानाबाद मार्फत पुढील कार्यवाहीसाठी अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समिती समोर हजर केले असता तिच्या आईकडून 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही असे हमीपत्र घेऊन कुटुंबाकडे सोपविण्यात आले आहे. पंढरपूर येथील एका 15 वर्षीय मुलीचा विवाह नळदुर्ग येथील 25 वर्षीय तरूणाशी 5 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी होणार असल्याची माहिती उस्मानाबाद येथील चाइल्ड-लाइन (1098) कडे प्राप्त झाली होती. उस्मानाबाद चाइल्ड - लाइनच्या पथकाने तत्काळ बाल संरक्षण अधिकारी योगेश शेगर यांच्यामार्फत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांना कळविली. त्यानंतर उस्मानाबाद चाइल्ड-लाइनचे संचालक डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड-लाइनचे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, टीम मेंबर रविराज राऊत हे नळदुर्गकडेे रवाना झाले. विवाह होणार्‍या अल्पवयीन मुलीची माहिती घेऊन हा बालविवाह रोखण्यात आला. चाइल्ड-लाइन च्या टीमने मुलीच्या आईचे समुपदेशन करून बालविवाहामुळे मुलीच्या आयुष्याचे नुकसान कसे होत असते याबाबत अवगत केले. त्यानंतर मुलीस उस्मानाबाद येथे बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए.डी. कदम, सदस्य श्री. कोळगे, श्री.कैलास मोटे, अ‍ॅड.आशा गोसावी यांनी मुलीचे व तिच्या आईचे योग्य ते समुपदेशन करुन समज देण्यात आली. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नसल्याचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेऊन मुलीस परत आईच्या स्वाधीन करण्यात आले. 
“कोरोना काळात सर्वत्र बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे उस्मानाबाद चाइल्ड-लाइन ने आतापर्यंत केलेल्या अनेक कार्यवाहीमुळे समोर आलेले आहे. कमी खर्चामध्ये विवाह समारंभ उरकले जात असले तरी अल्पवयीन मुलीच्या माता-पित्यांनी बालविवाहामुळे भविष्यात मुलीच्या आरोग्याच्या होणार्‍या नुकसानीचे भान ओळखले पाहिजे. आपल्या आजूबाजूस कुठे बालविवाह होत असल्यास जागरुक नागरिकांनी तात्काळ चाइल्ड-लाइन उस्मानाबाद च्या '1098' या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी.”- *डॉ. दिग्गज दापके-देशमुख* संचालक, चाइल्ड-लाइन उस्मानाबाद
 
Top