Views


*लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना घरांचे  हस्तांतरण करणेसाठी परवानगीची मागणी*



उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना घरांचे  हस्तांतरण करणेसाठी परवानगी मिळावी तसेच मूळ लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी भूकंपग्रस्त भागातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे गुरुवारी (दि. ९) निवेदनाद्वारे केली आहे. याविषयी सकारात्मक मार्ग काढून हा महत्वाचा विषय मार्गी लावू असे आश्वासन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी यावेळी दिले आहे. लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त भागातील अडचणीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोविंद साळुंके, भूकंपग्रस्त कृती समितीचे अमर बिराजदार, तालुका उपाध्यक्ष अजित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, गिरीश भगत, संजय जाधव, सचिन रणखांब, किसन पवार यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. ९) उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९९३ साली उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. त्यानंतर लोहारा व उमरगा तालुक्यातील अ व ब वर्गवारी असलेल्या गावांना महाराष्ट्र शासन व स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने घरे बांधून दिली होती. यामध्ये प्रामुख्याने उमरगा तालुक्यातील अ वर्गवारीचे १० गावे व ब वर्गवारीमध्ये ९ गावे तसेच लोहारा तालुक्यामध्ये अ वर्गवारीमध्ये १६ तर ब वर्गवारीमध्ये ३ गावे असे उमरगा व लोहारा तालुक्यात एकूण ३८ गावे आहेत. या भूकंपामुळे एकूण २५१७० घरे बाधित झाली होती. त्यापैकी उमरगा व लोहारा तालुक्यातील भूकंपामुळे बाधित गावांची अ, ब व क वर्गवारी करण्यात आली. अ वर्गवारी मध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या गावांची तर ब वर्गवारी मध्ये ७० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या गावांची तर क वर्गवारी मध्ये अंशतः नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यात आली. उमरगा व लोहारा तालुक्यातील अ व ब वर्गवारीतील एकूण २०४६० घरांचे वाटप करण्यात आले. सदर घरासंदर्भात हस्तांतरण वाटणी करण्यास प्रतिबंध असल्याने अनेक अडचणी येत आहेत. अशा बांधून दिलेल्या घरांची विक्री करण्यासाठी शासनाने कोणताही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. त्यामुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना वारसा हक्क मंजूर करणे तसेच हस्तांतरण, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, दानपत्र व गहाणखत विषयक हस्तांतरण संदर्भात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी आदेश काढून लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावांचा प्रश्न मार्गी लावला आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेश निघून जवळपास चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपणही आपल्या स्तरावर लातूर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आदेश काढून उमरगा व लोहारा तालुक्यातील अ व ब वर्गवारीतील ३८ गावातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना घराचे हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक ती परवानगी देण्यासंदर्भात तसेच घरांची खरेदी विक्री करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करावे तसेच मूळ लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्याकडे केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. मी स्वतः विभागीय आयुक्त यांच्याशी बोलून व लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडील माहिती प्राप्त करून हा विषय तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन दिले.
 
Top