*गुरुवर्य के.टी.पाटील यांच्या 93 व्या वाढदिवसा निमित्त विविध पुरस्कारांचे वितरण*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या 59 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आदरणीय गुरुवर्य के.टी. पाटील सर यांच्या 93 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणामध्ये झालेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध परीक्षेत यश मिळवलेले यशवंत गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेतील सेवानिवृत्त कर्मचारी, आदर्श कर्मचारी, पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. सदर सोहळ्यास अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील हे प्रमुख पाहुणे तर जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.धनंजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ.सचिन देशमुख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाॅ.बळीराम चौरे, गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, तुळजाभवानी बॅकेचे चेअरमन संजय पाटील, संस्थेच्या सरचिटणीस तथा नगरसेविका प्रेमाताई पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरुवर्य के.टी.पाटील सर यांचे वय व प्रकृती स्वास्थ्य पाहता सर्व मान्यवरांनी घरी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रास्ताविकात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा सांगितला. शैक्षणिक क्षेत्रातील हे यश केवळ गुरुवर्य के.टी.पाटील सर आणि त्यांच्या सर्व सहका-यांनी केलेल्या कष्टाचे चीज असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांच्या अनमोल अध्यात्मिक मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे स्वरूप भक्तिमय झाले. शिक्षणाला अध्यात्माची जोड असेल तर तेथे स्वयं परमेश्वर वास करीत असतो. आणि त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी कार्य सिध्दीस जाते. असे सांगून त्यांनी गुरुवर्य के.टी.पाटील सरांच्या सेवाभावी वृत्तीचा सर्वानी आदर्श घेण्यास सांगितले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. धनंजय पाटील यांनी आपण स्वतः या शाळेचे विद्यार्थी असल्याचा सतत अभिमान वाटतो. विद्यार्थी दशेत असताना गुरुवर्य के.टी.पाटील यांच्या शिस्तीमुळेच आम्ही घडल्याचे सांगितले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.बळीराम चौरे यांनी भोसले स्कूल ची शैक्षणिक गुणवत्तेची महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर नोंद घेण्याजोगी आहे असा उल्लेख केला. शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी सौ.रोहिणी कुंभार यांनी 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे भोसले स्कूल च्या शैक्षणिक परंपरेला देखील असाच वारसा आहे असे मत आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. निवासी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन देशमुख यांनी आपल्या आयुष्यातील शैक्षणिक जडणघडणीचा पाया के.टी.पाटील सरांनी कशा पद्धतीने रचला गोष्टीला उजाळा दिला. तसेच भरमसाठ संख्या असतानाही गुणवत्तापूर्ण शिक्षण हे या संस्थेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आदर्श शिक्षक श्री चंद्रकांत गिलबिले यांनी गुरुवर्य के.टी.पाटील सरांच्या कालावधीत पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत आलेले अनुभव सांगितले. प्रशासन चालवण्याचे कौशल्य, शिस्तबद्ध जीवनशैली, माणसे जोडण्याचे कसब, कार्य सिध्दीस जाईपर्यंत घेतली जाणारी प्रचंड मेहनत के.टी.पाटील सरांच्या अशा अनेक गुणांमुळे आम्ही घडली. कठीण काळातही सर्व शिक्षकांना के.टी.पाटील सरांनी कशाप्रकारे आधार दिला याविषयीच्या जुन्या आठवणी गिलबिले सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
सत्कार व सन्मान
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांच्या विकासात मोलाचे योगदान देणार्या आजी माजी पदाधिकारी व आदर्श कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. माजी प्राचार्य सुधीर पडवळ, डाॅ.बालाजी कामठाणे, सुरेश घोरपडे, सुमेरसिंह ठाकूर, सौ.मैना माळी, शंकर घोडके, सतिश करळे यांचा सेवा निवृत्तीबद्दल केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभरात संस्थेच्या विविध शाखेंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्या कर्मचाऱ्यांना आदर्श कर्मचारी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी अजित हरिदास माने, स्वप्निल सुरेश पाटील, नेताजी सुग्रीव मुळे, सौ.बलसुरे एस. एस. अमितकुमार जाधव, डाॅ.कृष्णा तेरकर, प्रा.बंडू नन्नवरे, प्रा.पुजारी डी.व्ही, सत्यजित शिंदे, चित्रा हंगरगेकर, प्रा.प्रतिक्षा ऐदाळे, प्रा.नयन क्षीरसागर, रवी माने, मुबारक शेख, नानासाहेब नलावडे आदींनी आदर्श कर्मचारी पुरस्कार पटकावला. मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. मागील वर्षी घेण्यात आलेल्या या परीक्षेत भोसले हायस्कूलचे 23 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. त्यातील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या पाटील सृष्टी गुणवंत (148 गुण), घेवारे प्रार्थना दिनेश (145 गुण), जानकर धीरज सुनिल (141 गुण) या तिघांचाही पालकांसमवेत सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या दहा विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. श्रावणी अरुण माने, राजवीर विठ्ठल लोमटे, मंथन कल्याण पांढरे, ऋषिकेश केशव पाटील, तन्वी अमोल वाणी, येसु ज्ञानेश्वर कदम, आर्या सचिन हुलसुरकर, विद्या रावसाहेब गांधले, श्रावणी सुरेश वाघमारे, श्रीयश सुभाष भोसले या 100% गुण मिळवणारर्या या दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकंसह मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी देशपातळीवरील प्रज्ञावान मुलांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध घेतली जाते. या NTSE परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या राजवीर विठ्ठल लोमटे व श्रावणी अरुण माने या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच के.टी.पाटील प्रज्ञावान शोध परीक्षेत जिल्ह्यातून प्रज्वल पंकज शिनगारे (प्रथम), मेघराज बब्रुवान शिंदे (द्वितीय), प्राप्ती प्रशांत जाधवर (तृतीय), वरद ऋषिकेश म्हेत्रे (तृतीय), शौर्य किशोर कदम (तृतीय) यश मिळवले. त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सध्याची कोरोनामय स्थिती पाहून गुरुवर्य के.टी.पाटील सर यांच्या 93 वाढदिवसानिमित्त 93 गरीब व गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दोन महिने पुरेल इतक्या अन्नधान्य कीटचे वाटप घरपोच करण्यात आले.प्रातिनिधिक स्वरुपात काविरा माळी, मंगल वाघमारे, लता गवळी, विठ्ठल गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. विनोद आंबेवाडीकर व केशव पाटील सर यांच्या संकल्पनेतून निर्माण केलेल्या बोटॅनिकल गार्डनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रा.साहेबराव देशमुख सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सूर्यकांत कापसे सर व अर्चना देशमुख मॅडम यांनी केले. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या व पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, अभिराम पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास विद्यार्थ्यी, पालक, जिल्ह्यातील मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.