*पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते
रानभाज्या महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
राज्याच्या कृषी विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या रानभाज्या महोत्सवाचे आज येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या परिसरात पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन झाले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि आत्म्याचे प्रकल्प संचालक यांच्यातर्फे या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महोत्सवात रानभाज्यांचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्यक्ष शेतकरी, शेतकरी गट यांनी यात सहभाग घेतला आहे. या उद्घाटन समारंभास खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कृषी सभापती दत्ता(अण्णा) साळुंके,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश बिराजदार, आत्म्याचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जि.प.चे कृषी विकास अधिकारी जी.टी.चिमनशेटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सचिन सुर्यवंशी, उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव, वाशीचे तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, कळंब तालुका कृषी अधिकारी बी.बी.जाधव तसेच कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या प्रदर्शनात अत्यंत दुर्मीळ अशा अनेक रानभाज्या आणण्यात आल्या आहेत. यात कुरडू पासून घोळे पर्यंत अनेक रानभाज्यांनी उपस्थितांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे शेतकरी-पुरुष-महिला या रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्व सांगून त्याच्या करण्याच्या पध्दतीचीही माहिती देत होते. त्यामुळे या सगळ्या रानभाज्या केवळ चवपालट म्हणून खाण्यासाठी नाहीत तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाच्या असल्याचे दिसून आले. आपल्या शेतकऱ्यांनी रानभाज्याचे जसे जतन केले आहे. तसेच त्याचे आयुर्वेदिक महत्वही साध्य केले आहे. या रानभाज्यांची या प्रदर्शनात विक्रीही करण्यात आली. यात प्रामुख्याने तांदुळजा, हादगा, आघाडा, चुका, पाथरी, अंबाडी, कडवंची, अळू, घोळ, चिघळ, चंदन बटवा, गुळवेल, शेवग्याचा पाला, काकळा/तरोटा, करडई, कुरडू, कर्टोली, सूरण, दिंडा, टाकळी, पिंपळ, मायाळू, आंबुशी, केना, भुई आवळी, कपालफोडी, आरंगी, उंबर, कुडा, काटेमार, चिवळ, बांबु आणि पानांचा ओवा आदी रानभाज्यांचा समावेश होतो. येथेच शेजारी ‘विकेल ते पिकेल’ या अंतर्गतही काही स्टॉल लावण्यात आले होते. त्यांची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी पाहणी केली. या रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील 60 शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट विविध रानभाज्यासह उपस्थित होते. यावेळी 10 क्विंटल रानभाज्यांची विक्री करण्यात आली. तसेच ‘विकेल ते पिकेल’ या कार्यक्रमांतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीकरिताच्या विविध कृषी उत्पादनांचीही विक्री करण्यात आली. यामध्ये ड्रगनफ्रुट, डाळींब, सेंद्रीय दाळी, सेंद्रीय गूळ यांचा समावेश होता. रानभाज्यामंध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. अनेक आजारांवर उपयोगी आहेत आणि जास्तीत जास्त रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश झाल्यास विविध आजारांवर मात करता येईल, त्याकरिता अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त रानभाज्यांचे उत्पादन घेउन यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ करुन त्यांची मुल्यवृध्दी करावी. अशा रानभाज्यांची दैनंदिन विक्री करावी, असे मत पालकमंत्री श्री.गडाख यांनी व्यक्त केले.