Views


*रस्त्यांना कृती आराखड्यात ग्रामीण मार्ग क्रमांक
 द्या सारोळा, वाघोली, सकनेवाडीसह टाकळीतील
 रस्त्यांचा समावेश, आ.कैलास पाटील यांचे 
कार्यकारी अभियंत्यांना पत्र, ग्रामपंचायत 
सदस्य बाकले यांचा पाठपुरावा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शेतरस्त्याचा पॅटर्न म्हणून सारोळा पॅटर्न समोर आला आहे. त्यामुळे सारोळासह वाघोली, सकनेवाडी, टाकळी (बें.) येथील रस्त्यांना कृती आराखड्यात ग्रामीण मार्ग क्रमांक देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आ. कैलास घाडगे- पाटील यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले यांच्याकडे पत्राद्वारे दिले आहेत. सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी मंगळवारी (दि.२७) हे पत्र कार्यकारी अभियंत्यांकडे सुपूर्द केले. कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक), वाघोली, सकनेवाडी व बोरखेडा येथील बहुतांशी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना या मार्गावरून वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच हे रस्ते कोणत्याही कृती आरखड्यात नसल्याने रस्ता काम करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच निधी मिळत नसल्याने वर्षेनुवर्षे रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहत आहे. हे रस्ते करण्याची शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होत असून तत्काळ कृती आराखड्यात या रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्याचे पत्रात म्हटले आहे. यामध्ये शहाजी झोंबाडे यांचे शेत ते जुना बेंबळी रस्ता, उस्मानाबाद-लातूर महामार्ग ते दारफळ जोडरस्ता, सारोळा-मेडसिंगा ते जुना बेंबळी रस्ता, सकनेवाडी ते मसोबा मंदीर रस्ता, मेडसिंगा रस्ता ते राजाभाऊ कासार यांच्या शेतापर्यंत, उस्मानाबाद - लातूर राज्य महामार्ग ते मेडसिंगा-चिखली रस्ता, सकनेवाडी ते उस्मानाबाद-लातूर राज्य महामार्ग, वाघोली-वाणेवाडी रस्ता ते वाघोली मध्यम प्रकल्पाकडे जाणारा रस्ता, टाकळी (बें) ते बोरखेडा गाव जोडरस्ता या रस्त्यांचा समावेश करण्याचे आ.कैलास घाडगे-पाटील यांनी पत्राद्वारे निर्देश दिले असून सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी हे पत्र कार्यकारी अभियंत्यांकडे सुपूर्द केले आहे.
 
Top