Views


*खेड येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे भानामती संदर्भात समुपदेशन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील खेड (तांडा) येथे बंजारा समाजातील दोन गटात भानामती-करणी करत असल्याच्या प्रकरणातून मारामारीचे प्रकरण घडले. सदर प्रकरणाबाबत काही जागरुक ग्रामस्थांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना कळविले. घडलेला प्रकार असा की, खेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा खेड तांड्यातील नाईक विलास बाळू जाधव हे माझी सून हिच्यावर करणी - भानामती करतात, अशी तक्रार करीत वामन रामा जाधव, पत्नी सरुबाई वामन जाधव तसेच मुले अशोक आणि अनिल या चौघांविरुद्ध तशी फिर्याद लोहारा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तर ज्यांच्यावर आरोप करण्यात आला ते वामन रामा जाधव यांनीही विलास बाळू जाधव, अरुण विलास जाधव व शांताबाई विलास जाधव या तिघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. दोन्ही गटाकडून परस्पर गुन्हे दाखल झाले असून पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल बोदमवाड व पोलिस नाईक विजय कोळी पुढील तपास करीत आहेत. यामुळे गावात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे वृत्त समजताच महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्ते यांनी लोहारा पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर पाहिला खात्री झाल्यावर तेथील पोलिस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे व पोलिस नाईक विजय कोळी व अन्य कर्मचाऱ्यासह खेड (तांडा) येथे भेट दिली. या भेटीत खेड येथील प्रकरणातील आरोपी व फिर्यादी पक्षातील इसमासह खेड येथील पोलिस पाटील अमोल गव्हाळे, माळेगाव पोलिस पाटील बालाजी कदम, गोरसेना जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, प्रतिष्ठीत ग्रामस्त, गौर बंजारा युवक, महिला उपस्थित होत्या. सेवालाल समाज मंदिरात रविवारी दि.11 जुलै रोजी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करीत महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.किरण सगर, जिल्हा प्रतिनिधी प्रा.डॉ.महेश मोटे, उमरगा शहर आघाडीचे पाशा कोतवाल यांनी करणी - भानामती हा प्रकार अस्तित्वात नसून जाणते, मांत्रिक, भामटेबुवा-बाबा यांच्या नादी लागून वेळ-श्रम-पैसा वाया घालवू नये. यामुळे समाजातील लोकांची फसवणूक होते तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण होते. अशा ज्या घटना घडतात यामुळे नाहक समाजात तेड निर्माण होऊन समाजातील शांतता लोप पावते. अशी माहिती देत समाजात घडत असलेल्या करणी-भानामतीच्या अनेक घटना उदाहरणासह सविस्तरपणे मार्गदर्शन करुन येथील नागरिकांचे समुपदेशन केले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे यांनी देखील जादूटोणा विरोधी कायदा- 2018 यासंदर्भात सविस्तर माहिती, त्याचे स्वरूपाबाबत व त्या गुन्ह्याचे दुष्परिणाम काय आहेत हे स्पष्टपणे मांडले. यावेळी शरण कडबाने, अर्जुन जाधव, अमोल राठोड, भिमराव मोरे, प्रकाश राठोड, किशन पवार, शहाजी जाधव, सचिन जाधव, भाऊराव राठोड, आदींची उपस्थिती होती.
 
Top