Views



*नगरपंचायतच्या रोजंदार सफाई कामगरांच्या पगारात निम्म्याने कपात केल्याने सफाई कामगारांचे लोहारा शहरातील शिवाजी चौकात आंदोलन*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 लोहारा नगरपंचायतच्या रोजंदार सफाई कामगरांच्या पगारात निम्म्याने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त सफाई कामगारांनी दि.10 जुलै रोजी शहरातील शिवाजी चौकात आंदोलन केले. कामगार आक्रमक झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षे केल्याने वातावरण निवळले. लोहारा नगरपंचायतीने शहरातील कचरा संकलन करण्याचे कंत्राट लातूर येथील जनाधार संस्थेला दिले आहे. मागील पाच वर्षापासून जनाधार संस्था जवळपास 50 रोजंदार सफाई कामगारांच्या माध्यमातून शहरातील कचारा संकलन करून शहर स्वच्छतेचे काम करीत आहे. शहर व परिसरातील सफाई कामगार गेली काही वर्षापासून काम करीत आहेत. या सफाई कामगारांना संस्थेकडून प्रतिदिन 225 रूपये पगार दिला जातो. परंतु जुलै महिन्यापासून पगारात निम्म्याने कपात करीत प्रतिदिन 110 रूपये पगार देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. हा निर्णय कामगारांना आर्थिक संकटात टाकणारा आहे. संस्थेने रोजंदारी सफाई कागमगारांचा पगार चक्क निम्म्याने कमी करण्यात आला आहे. याबात कामगारांनी विचारणा केली असता "परवडत नसेल तर कामावर येऊ नका" असे संस्थेकडून कामगारांना सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांनी काम न करण्याचा निर्णय घेताच जनाधार संस्थेने उमरगा येथून सफाई कामगार बोलवून घेतले. त्यामुळे कार्यरत असलेल्या सफाई कामगारांनी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करीत संस्थेचे दिलीप चव्हाण यांना घेराव घातला. सफाई कामगार आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वातावरण निवळले. त्यानंतर माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसंदर, अभिमान खराडे, श्याम नारायणकर, श्रीकांत भरारे, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, संस्थेचे संचालक चव्हाण व सफाई कामगार यांच्यात बैठक झाली. सफाई कामगारांच्या कामाचे तास कमी करून प्रतिदिन 160 रूपये पगार देण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
Top