Views





*आशा कर्मचाऱ्यांचा विविध हक्कांच्या मागण्यांसाठी बेमुदत संप ! लातूर जिल्ह्यातील उदगीर-देवणी-जळकोट च्या ४५० आशा वर्करस् व गटप्रवर्तक प्रदेशअध्यक्ष भगवानराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली होणार संपात सहभागी!*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे प्रदेशअध्यक्ष भगवानराव देशमुख व सिटू इतर विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेचे कामही अतिरिक्त मोबदला न देता करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटीजेन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर  होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप होत आहे. लातूर जिल्ह्यातील तसेच उदगीर-देवणी-जळकोट तालुक्यातील शहर ग्रामीण हॉस्पिटलचे व उपजिल्हा रूग्णालयाचे तसेच नगरपरिषद, नगरपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्वच्या सर्व आशांनी एकत्र येत या संपात सहभागी होत असल्याचे निवेदन आज जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महासंघाचे प्रदेशअध्यक्ष भगवानराव देशमुख, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्षा रंजना गारोळे, गौतम आदमाने, आरोग्यमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे, उदगीर तालुका अध्यक्षा मायाताई बिरादार-मुंडकर, गटप्रवर्तिका अनिता पाटील, जयश्री बिरादार तसेच आशा कार्यकर्ती भद्रे शोभा, बरुरे आर्चना, कल्पना सोलापुरे, शांता डिगे, भारत पोतदार, आरुणा बोळेगावे आदीसह २०० आशा वर्कर आणि ८ गटप्रवर्तिकांसह, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या नेत्या, जिल्हा संघटक यांच्यासह मोठ्या संख्येने आशा  व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
 
Top