Views
*राज्यातील पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर्स घोषित करून त्यांना कोरोना प्रतिबंधक लस दया अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा -- महाराष्ट्र पत्रकार संघ*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

राज्यातील पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर्स घोषित करून त्यांना कोरोना प्रतिबंधक लस व इतर सेवा-सुविधा तात्काळ देण्यात याव्यात, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांनी एका निवेदनाद्वारे नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ऑनलाइन माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना संसर्गाच्या महामारीच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा लढत आहे. त्या प्रमाणेच पत्रकार बांधवही जीव मुठीत घेऊन आपली कर्तव्य व समाजिक बांधीलकी जोपासत काम करत आहेत. या संसर्गाच्या काळात देखील गेल्या वर्षापासून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निधड्या छातीने पत्रकार बांधव तोंड देत आहेत. त्यांचे वार्तांकनाचे काम वेळीअवेळी अविरतपणे सुरू आहे. त्यांच्यामुळेच या कठीण काळात राज्यभरातल्या ठिक-ठिकाणांच्या बातम्या प्रसार माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत‌. दुर्दैवाने वार्तांकनाचे काम करताना महाराष्ट्रातील सहा हजारांच्यावर पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १३७ पत्रकारांचा मृत्यु तर त्यांच्या कुटुंबातील शेकडो लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांना आजतागायतपर्यंत कुठलीही मदत सरकारने जाहीर केलेली नाही की त्यांच्यासाठी स्वतंत्र आरोग्य सेवा दिलेली नाही. कोरोनामुळे आजही काही पत्रकार मृत्युशी झुंज देत आहेत. लोकशाहीतील चौथा स्तंभ अडचणीत असतानाही याकडे शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची भावना पत्रकारांमध्ये आहे. लॉकडाउनच्या काळात तर अनेक पत्रकारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अशा पत्रकारांकडे उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने कुटूंबाचे कर्ते आणि संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असल्याने काही पत्रकारांनी तर चहा टपरी व अन्य व्यवसाय सुरु करुन उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचेकडे पुरसे भांडवल नसल्याने जेमतेम पोटासाठी व्यवसाय करुन कुंटूबाची उपजीवीका भागवत आहेत. तर सध्या काहीजनावर उपाशीपोटी राहण्याची वेळ देखील आली असून काहींच्या घरामध्ये तर विविध समस्यांनी डोकेवर काढले आहे. त्यात कोरोना आजाराने कुटूंबातील अनेकजण बाधित आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढणे मुश्किल झाले आहे. त्यांच्यावर औषधोपचार करण्याकरिता त्यांच्याकडे पैसाही नाही. महागडा दवाखाना गाटणे देखील अडचणीचे झाले आहे. अशावेळी पत्रकारांनी जगावे की मरावे ? असा प्रश्न त्यांना पडला आहे. यातून निर्माण होणाऱ्या अशा दुर्घटना टाळण्यासाठी तसेच वार्तांकनाचे काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना बिधास्तपणे काम करता यावे, यासाठी त्यांचा समावेश फ्रन्टलाइन वर्करमध्ये करण्यात येवून त्यांना संबंधित सर्व सेवा-सुविधा पुरविण्यात याव्यात व त्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी, पत्रकार, छायाचित्रकार तसेच कॅमेरामन यांना ताबडतोब विश्वासात घेवून आमची मागणी मान्य करावी. या निवेदनावर उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण जाधव, नांदेड जिल्हाध्यक्ष नामदेव यलकटवार, नागपूर जिल्हाध्यक्ष गजेंद्र सिंह लोहिया, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.संजय शेळके, बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब हुंबरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत बाविस्कर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जगदीश कदम, मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष अनुज केसरकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, लातूर जिल्हाध्यक्ष पंकज तगडपलेवार यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष व राज्य पदाधिकाऱ्यांच्या सहया आहेत.
 
Top