Views
*कोरोनाच्या कडक लॉकडाऊनमध्ये मौजे
 जवळा दु. व आळणी शिवारात शेळी --
बोकडांचा बाजार भरविणाऱ्यावर कडक कारवाई 
करण्यात यावी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे*


उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कोरोनाच्या कडक लॉकडाऊनमध्ये मौजे जवळा दु. व आळणी शिवारात शेळी-बोकडांचा बाजार भरविणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र उस्मानाबाद भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील मौजे जवळा दु. व आळणी शिवारात मागील चार ते पाच आठवडया पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयाच्या मालकीच्या शेतात मध्यरात्री शेळी-बोकडांचा बाजार भरविला जात आहे. सोमवारी मध्यरात्री सुरु होणारा हा बाजार मंगळवारच्या पहाटेपर्यंत चालू असतो. या बाजारात मोठया संख्येने विक्रेते खरेदीदार उपस्थित रहात आहेत. 100 ते 200 छोटी-मोठी वहाने जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून येत आहेत. मध्यरात्री सुरु असलेला हा बाजार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या पत्नी सौ. मेहजबीन नवाब मलिक, कन्या सना नवाब मलिक, मुलगा फराज नवाब मलिक व बुश्रा संदुश फराज, समीन नवाब मलिक, निलोफर समीर खान इत्यादिंच्या नावे असलेल्या आळणी शिवारातील गट क्र. 339 व जवळे दु. येथील सलग्न 283/2, 283/4, 283/5 जमीनीवर भरत आहे. सद्य स्थितीत महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी कडक लॉकडाऊन सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा मृत्यू दर जास्त असल्यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तुंचे दुकाने, रुग्णालये व औषधी दुकाने वगळता सर्व बाजरपेठ बंद आहे. असे असतांना मध्यरात्रीचा बाजार हा मंत्री महोदय नवाब मलिक यांच्या पाठिंब्यावर चालू असल्याचे कळते. मंत्र्याच्या कुटुंबीयांकडूनच कोरोनाच्या काळात सर्व नियम पायदळी तुडवत शेळी-बोकडांचा बाजार भरविणे व प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न करणे हे चूकीचे आहे. कोरोनाचा हाहाकार चालू असतांना असंख्य लोकांच्या जिवनाशी खेळ मांडलेला हा शेळी बोकडांचा बाजार भरविणारे ज्यांच्या जागेत भरविला जातो ते मलिक कुटुंबीय व संबंधीतावर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी तातडीने कार्यवाही करुन कोरोना काळात असा बाजार भरविणाऱ्यायाच्या पाठीशी राहणाज्या मंत्री नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, नगरसेवक प्रवीण पाठक, उपस्थित होते‌.

 
Top