Views
*हातावर पोट असणारे छोटे व्यवसाय धारक यांना तात्काळ दुकाने चालू करण्याची परवानगी देण्यात यावी -- राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आयुब शेख*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


हातावर पोट असणारे छोटे व्यवसाय धारक यांना तात्काळ दुकाने चालू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या संसर्ग आजाराने देश होरपळून निघत आहे, अशा भीषण संकटामध्ये लोहारा तालुकासह शहरामध्ये कोरोना संसर्ग आजाराने नागरिक त्रस्त आहेत. अशा भीषण संकटामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील मजूरवर्ग विधवा परितक्त्या तील महिला, हातावर पोट असणारे छोटे व्यवसाय धारक, किराणा दुकान, हॉटेल व्यवसायधारक, पान टपरी चालविणारे, फळविक्रेते, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, छोटे व्यवसाय धारक यांचे जनता कर्फ्यु मुळे आर्थिक व्यवहार बंद असल्याने खचून गेले आहेत. यांची आर्थिक कुचंबणा होत असून या कुटुंबातील नागरिकांचें संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील शेतकऱ्यांनी पिकवलेले भाजीपाला नासुन जात आहे. तसेच पान टपरीधारक यांचे या व्यवसायावरच संसाराच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे ती गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने अशा छोट्या व्यवसाय धारकांना पैसाच जवळ नसल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच जनता कर्फ्यू लागू असल्याने या छोट्या व्यवसाय धारकांचा देखील विचार करून फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे व्यवसाय धारक, किराणा, हॉटेल व्यवसाय, यांना तात्काळ मुभा देण्यात यावी, अन्यथा या छोट्या व्यवसाय धारकांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने सदर या निवेदनाच्या अनुषंगाने गांभीर्याने विचार करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आयुब शेख, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, माजी नगरसेवक गगन माळवदकर, स्वप्नील माटे, उपस्थित होते.
 
Top