Views






*शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न आता वाघोलीतही राबणार! शेतकऱ्यांच्या सहमतीसह लोकवर्गणीतून काम होणार! वर्षेनुवर्षाची किटकिट संपविण्याचा उचलला विढा! सारोळा ग्रापं सदस्य बाकले यांची भेट; शेतकऱ्यांशी साधला संवाद*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे सुरू करण्यात आलेली शेतरस्त्यांची चळवळ आता व्यापक बनत आहे. काजळा, चिखली नंतर आता वाघोली शिवारातही शेत रस्ता मोहिमेस सुरुवात होत आहे. सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी रविवारी (दि.१६) शेतकऱ्यांशी भेट घेवून संवाद साधला. तसेच यावेळी शेतकऱ्यांनी हा रस्ता करण्यास सहमती दर्शविली असून दोन दिवसात प्रत्यक्षात मातीकामास सुरूवात करण्यात येणार आहे.
सारोळा येथील शेतरस्त्याचा पॅटर्न जिल्ह्यात गाजत आहे. वाघोली येथील शेतकऱ्यांनी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांना फोन करून रस्त्याची समस्या मांडली. त्यानंतर बाकले यांनी वाघोली शिवारात जावून शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांची सविस्तर चर्चा करून रस्ता करण्याचे ठरले. त्यामुळे दोनच दिवसात या रस्ताकामास प्रारंभ होणार असून मातीकामासह मजबुतीकरण करण्यात येणार आहे. दरा फिटर ते नागाळा शिवारातील शेतकऱ्यांना अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत पिकांना खत द्यायचा म्हटले तरी डोक्यावरून घेऊन जावे लागत आहे. तसेच ऊस गाडी असतील किंवा शेतीची मशागत, आंतरमशागत करायची असेल तर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लवकरच शेतकऱ्यांची ही अडचण आता दूर होणार आहे. विशेष म्हणजे रस्त्याचे मातीकाम हे या शिवारातील शेतकरी स्वखर्चातून करणार आहेत. त्यामुळे शेतरस्त्यांची चळवळ आता व्यापक बनत असून याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. याप्रसंगी प्रदीप खडके, महादेव खडके, महेश खडके, पिंटू खडके, गोवर्धन खडके, संदीप खडके, बाळासाहेब गोरे, विशाल खडके, स्वप्नील मते, साजिद शेख, गणेश मगर, असिफ सय्यद, दिपक शेळके, दिनेश पाटील, प्रसाद चाबुकस्वार, धर्मा राऊत आदींसह शेतकरी उपस्थित होते.
 
Top