Views





*अचलेर येथे अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुक्यातील अचलेर येथे अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सागर गोकुळ भद्रा (उर्फ बंगाली) या इसमावर दि.25 मे 2021 रोजी रंगेहाथ पकडून मुरूम पोलिस स्टेशन येथे रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दि.11 मे 2021 अचलेर येथील रहिवाशी विष्णू लोहार यांनी सदर इसम कोरोना बाधीत रुग्णांना घरी जाऊन उपचार देतो अशी लेखी तक्रार केली होती. त्यानंतर अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरूद्ध कार्यवाही साठी पथक तयार करण्यात आले. आणि त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. दि.25 मे 2021 रोजी गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहा.गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, वाहन चालक राजू कांबळे हे प्रा.आ.केंद्र, आष्टा कासार येथे कोविड लसीकरण सत्रास भेट देण्यासाठी गेले असता, अचलेर येथे राजरोसपणे उपचार सुरू असलेबाबत माहिती मिळाली. त्यावेळी तात्काळ मुरूम पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून पोलिस कॉन्स्टेबल संजय नायकल यांना अचलेर येथे बोलावण्यात आले. आणि सर्व पथकाने अचानकपणे धाड टाकून सदर इसमास रुग्णावर उपचार करताना रंगेहाथ पकडले. त्याचा सर्व ऐवज जप्त करण्यात आले व त्यास मुरूम पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले व रात्री 9:22 वाजता ऑनलाईन FIR करून गुन्हा दाखल करण्यात आला.


 आवाहन

सद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरी कृपया सर्व नागरिकांनी शासकीय रुग्णालय अथवा नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर कडूनच उपचार घ्यावेत. अनाधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून उपचार घेऊन स्वतः चा तसेच इतरांचा जीव धोक्यात आणू नये. शॉर्टकट खूप महागात पडू शकतो हे लक्षात ठेवावे.

 
Top