Views


*पालकमंत्री कोरोना संक्रमीत झाल्याने सद्य स्थितीत त्यांना कामाचा व्याप न देता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांवर तात्पुरती जबाबदारी देण्यात यावी -- राणाजगजितसिंह पाटील*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यात कोवीड - १९ चा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून हा आकडा ३००० च्या वर गेला आहे. दिवसा गणिक यात जवळपास ५०० रुग्णांची भर पडत आहे. प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना काम करत असताना अनेक मर्यादा येत असल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सयुक्तपणे काम करून यावर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. दुर्दैवाने जिल्ह्याचे पालकमंत्री देखील कोरोणा संक्रमित असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये संयुक्त बैठका होत नाहीत. कोरोणा मुळे उद्भवलेली ही अभूतपूर्व व प्रचंड अशी आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री आजारातून बरे होई पर्यन्त राज्य मंत्रिमंडळतील इतर मंत्री महोदयांना जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्राधिकृत करण्याची मागणी आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. उस्मानाबाद सह एकूणच राज्यात कोवीड - १९ चा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिवसें दिवस हा आकडा वाढतच असून यावर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. पालकमंत्री ना.शंकरराव गडाख २६ जानेवारी पासून जिल्ह्यात येवू शकले नाहीत. दुर्दैवाने ते दुसऱ्यांदा कोविड - १९ संक्रमित झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत अशी समस्त जिल्हावासीयांच्या वतीने आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत इतर कोणतेही मंत्री परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात आले नाहीत, ही शोकांतिका आहे. उस्मानाबाद जिल्हा राज्यात आहे की नाही असा प्रश्न जिल्हावासीयांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात रेमडेसिव्हिर औषधाचा तुटवडा भासत होता, कोवीड सेंटर मधील आहाराबाबत देखील रुग्णांच्या तक्रारी येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग व योग्य ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करणे गरजेचे आहे. याबाबत ठरवून दिलेल्या नियम व निकषा प्रमाणे कार्यवाही होते की नाही हे पडताळणे गरजेचे असून यावर देखरेख जरूरी आहे. रुग्ण संख्येचा वेग पाहता खाटांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी भौतिक सुविधांसाह औषधे, डॉक्टर्स व सपोर्टिंग स्टाफ गरजेचा आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना अनेक काम करताना अनेक मर्यादा येतात. पालकमंत्री संक्रमित झाल्याने सद्य स्थितीत त्यांना कामाचा व्याप न देता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांवर तात्पुरती जबाबदारी देणे आवश्यक आहे. काही कठोर निर्बंधां सोबतच प्रभावी उपाय योजनांची अंमल बजावणी देखील गरजेची आहे.
अति दक्षता विभागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यकते प्रमाणे तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व सपोर्टिंग स्टाफ बाबत काही उणिवा आहेत. अनेक वेळा मागणी करूनही त्या पूर्ण केल्या जात नाहीत. फिजिशियन, भूलतज्ञ, अति दक्षता विभाग तज्ञ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व सपोर्टिंग स्टाफ आवश्यकते प्रमाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रेमडेसिव्हिर,ऑक्सिजन सह इतर आवश्यक औषधांचा पर्याप्त साठा, लसीकरणाचा वेग व चाचण्याची संख्या वाढविणे गरजेचे आहे. ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत अनेक कठोर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. यामुळे हातावर पोट असणारे, रोजनदारी करणारे व छोटे व्यापारी प्रचंड अडचणीत आले आहेत, त्यांच्या साठी देखील आता विशेष पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. या सर्व बाबींसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या वारंवार व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे बैठका आयोजित करून निर्णय होणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे अभिप्रेत आहे. इतर जिल्ह्यात अशा बैठका होतात. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी या परिस्थितीत पालकमंत्री महोदयांना कामाचा ताण न देता ते आजारातून बाहेर पडे पर्यंत राज्य मंत्रिमंडळतील एखाद्या मंत्री महोदयांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्राधिकृत करावे, अशी मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.
 
Top