Views


*आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ऊर्जेची बचत करा -- केदार खमितकर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
सध्या शहरीकरणाच्या नावाखाली व मानवाच्या अतिरेकी हव्यासापोटी नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास मोठया प्रमाणात होतो आहे. मानवाच्या भविष्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे, उपलब्ध ऊर्जा शक्तीचा उपयोग योग्य कारणांसाठी करणे, पुरेपूर वापर करून त्याची योग्यती बचत करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असून अनावश्यक इंधनाचा वापर करणे टाळा, वेळेची तुलना ऊर्जेसोबत जोडली पाहिजे. वेळेचे महत्त्व जाणून ऊर्जा व्यवस्थापनाशी सांगड घालणे महत्वाचे आहे. भविष्यात एक दिवस इंधन संपणार आहे. इंधन ही खरी राष्ट्राची संपत्ती असून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ऊर्जेची बचत करा असे प्रतिपादन केदार खमितकर यांनी केले. भारत सरकार पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघ व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा मुरुम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. पीसीआरए ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयामार्फत चालविली जाणारी एक राष्ट्रीय संस्था आहे. ब्रह्माकुमारीच्या मुख्य प्रशासिका जानकी दीदी यांच्या प्रथम पुण्यस्मृतिचे औचित्य साधून वैश्विक आध्यामात्मिक जागृती दिनानिमित्य आयोजित ऊर्जा संवर्धन कार्यशाळेत ' भारतीय लोक आणि ऊर्जा व्यवस्थापन ' या विषयावर ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी प्रोजेक्टरद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक वसंत बाबरे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य काशिनाथ मिरगाळे, प्रजापिता ब्रह्मा कुमारी मुरूम सेवाकेंद्राचे संचालक राजयोगी ब्रह्मा कुमार राजूभाई , प्रा.करबसप्पा ब्याळे, लातूरचे किरण खमितकर, सारीका दीदी, अनिता दीदी, आप्पासाहेब पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.वसंत बाबरे म्हणाले की, आपण सर्वांनी मिळून अध्यात्माच्या माध्यमातून प्रत्येकाने एक युनिट ऊर्जेची बचत केली तर राष्ट्राची दोन युनिटची बचत होणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक राजूभाई भालकाटे तर पाहुण्यांचा परिचय शिल्पा क्षीरसागर यांनी करून दिला. सूत्रसंचालन सहशिक्षक नागनाथ बदोले तर आभार रतनभाई पटेल यांनी मानले. अनिता मिरकले, वैष्णवी दीदी,सविता भरदाळे यांनी पुढाकार घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांनी शासनाच्या कोवीड-१९ नियमांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. फोटो ओळी : मुरूम, ता. उमरगा येथील ऊर्जा संवर्धन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्याख्याते केदार खमितकर, अध्यक्षस्थानी डॉ.वसंत बाबरे, प्रमुख अतिथी डॉ. महेश मोटे, संचालक राजूभाई भालकाटे, माजी प्राचार्य काशीनाथ मिरगाळे, सारीका दीदी, प्रा.ब्याळे आदी, उपस्थित होते.
 
Top