Views


*हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळेच्या स्मारकासाठी सूचना करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची शाळेस भेट देऊन चर्चा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळेस यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे नेते स्वातंत्र्य सैनिक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शाळेस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट देऊन या शाळेच्या शताब्दी वर्षा निमित्त या शाळेच्या परिसरात स्मारक कशा स्वरूपात उभारता येईल, याबाबत शाळेशी संबंधित लोकांशी चर्चा केली. या स्मारकाबाबत नागरिकांनी सूचना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे. या शाळेला मराठवाडयाच्या मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगाने जसे महत्व आहे. तसेच निजाम राजवटीत राष्ट्रीय भावना रुजविण्याचे कामही या शाळेने केले आहे. त्यामुळे या शाळेने चार भिंतीतले शिक्षण देण्याबरोबरच जिल्हयातील त्यावेळच्या मुलांना शाळेबाहेरच्या जगात उभे राहण्याचे बाळकडूही पाजले. हिप्परगा रवा येथील या राष्ट्रीय शाळेची सुरूवात 1921 मध्ये झाली. सातशे लोकवस्तीच्या या चिमुकल्या गावात व्यंकटराव देशमुख आणि त्याचे बंधु अनंतराव यांनी या शाळेची सुरुवात केली. विशेष म्हणजे या शाळेने त्यावेळी हैद्राबाद सरकारने निश्चित केलेला अभ्यासक्रम नाकारून इंग्रजी शासनाने मान्य केलेला आणि राष्ट्रीय महाविद्यालयात शिकवला जाणारा अभ्यासक्रम स्वीकारला होता. गावलगतच्या दोन एकरांवरच्या प्रशस्त जागेतील ऐंशी खण असलेल्या इमारतीत दिवसा शाळा भरत असे आणि रात्री तिचा वसतीगृह म्हणून उपयोग केला जाई.तेंव्हा या शाळेत 150 मुलं होती. त्याना जातपात न मानता एकत्र राहण्या- जेवणाची अट होती. या शाळेत मानवेंद्रनाथ रॉय यांचे सहकारी के.के. देशपांडे, पुढे लोकसत्ताचे संपादक झालेले ह.रा. महाजनी, हैद्राबाद मुक्तीसंग्रामचे सेनानी व्यंकटेश खेडगीकर ऊर्फ स्वामी रामानंद तीर्थ, रा.गो.ऊर्फ बाबासाहेब परांजपे असे शिक्षक होते. या महान नेत्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमित या शाळेच्या शताब्दी निमित्त या शाळेच्या इतिहासास शोभेल आणि जनतेच्या कायम स्मरणात राहील असे स्मारक उभारले जाण्याची गरज आहे. हे स्मारक कसे असावे याबाबत जनतेने सूचना केल्यास त्या सूचनांचा विचार करून हे स्मारक साकारण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. तेंव्हा जनतेने या शाळेच्या स्मारकाबाबत सूचना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे. दरम्यान, दिवेगावकर यांनी दि.25 मार्च 2021 रोजी या शाळेस भेट देऊन अनंतराव देशमुख यांचे पुतणे देशमुख, आमदार ज्ञानराज चौगुले, संस्थेचे सचिव पंडित जाधव, स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोईटे, हिप्परग्याचे सरपंच राम मोरे, पोलीस पाटील संजय नरगाळे, संस्थेचे अध्यक्ष वामन देशमुख, आदींशी चर्चा केली. यावेळी उमरग्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी (भुसूधार/सामान्य प्रशासन) सचिन गिरी, तहसीलदार संतोष रूईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी पं.स.सदस्य सुधीर घोडके, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top