Views


*कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली प्रत्यक्ष पिकांची पाहणी व अधिकाऱ्यांनी केली शेतावरच १३० किलो खरबूजची खरेदी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला  
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोहारा तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन भेट देत पहाणी करून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर या पाहणी दरम्यान शेतकऱ्याच्या शेतातील खरबुजची थेट खरेदी केली. तर तालुक्यातील कृषी कामासंदर्भात मासिक चर्चासत्र दि.२४ मार्च रोजी घेण्यात आले. या प्रक्षेत्र भेटीमध्ये लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील शेतकरी महेश डोंगरे यांनी सुरू केलेल्या मशरूम प्रकल्पाची पाहणी करून त्यांना विपणन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तर हा प्रकल्प करण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतकऱ्यांनी mahadbt या पोर्टलवर अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अवजारे बँकेची पाहणी करून शेतकरी गटातील शेतकऱ्यांना अवजारे बँक वापर आणि त्याचे अभिलेखे ठेवण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तर जेवळी येथे बसवराज वलदोडे यांच्या शेतावर सिताफळ लागवड व त्याची निगा यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोघा बु येथील भुजंग महादेव साबळे यांच्या फळबागेची पाहणी करून पेरु लागवड व त्याची छाटणी कशी करावी ? या विषयी कृषी विज्ञान केंद्राचे गणेश मंडलिक यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. तर शिवाजी जाधव यांच्या फुल शेतीस भेट देऊन पाहणी करीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या काटेकोरपणे वापर करण्यात यावा यासाठी पोखरा योजने अंतर्गत शेततळे, अस्तरीकरण व ठिबक सिंचन पद्धतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले. तसेच हिप्परगा रवा येथील विजयकुमार कुलकर्णी यांच्या आंबा बागेची पाहणी करून किड व रोग संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. प्रक्षेत्र भेटी नंतर लोहारा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मासिक चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील पीक परिस्थिती व त्यावरील उपाय योजना या संदर्भात कृषी विद्यावेत्ता वसंत सूर्यवंशी व हवामान तज्ञ एस.एल. हरवाडीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृषी अधिकाऱ्यांनी केली १३० किलो खरबुजाची खरेदी विकेल ते पिकेल या संकल्पने अंतर्गत नागराळ येथील गणेश गोरे यांच्या भाजीपाला स्टॉलला छत्री भेट देऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत १३० किलो खरबूज खरेदी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आपला माल विक्री करण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज भासली नाही. तर व्यापाऱ्याची होत असलेली मध्यस्थी यामुळे टळण्यास मदत झाल्याने शेतकऱ्यांना देखील याचा आर्थिक फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट शेतकऱ्याकडूनच माल विकत घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, बजरंग मंगरूळकर, लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, ज्ञानेश्वर जाधव, सुनील जाधव, नामदेव गायकवाड, महारुद्र मोरे, बी.बी. जाधव, संजय गायकवाड व संतोष कोयले, यांच्यासह लोहारा तालुक्यातील कृषी सहाय्यक, उपस्थित होते.
 
Top