Views*"कोरोना डेज'' या युवराज नळे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न..*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

शांतिदूत परिवाराद्वारे "कोरोना डेज" या युवराज नळे लिखित, मुक्तरंग प्रकाशन द्वारा प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अरविंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व जि प अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जि प माजी अध्यक्ष नेताजी पाटील, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, मसाप अध्यक्ष नितीन तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सन्माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, कोरोना काळाने माणसाच्या जगण्यात मोठ्याप्रमाणात फेरबदल केले. समाजातील प्रत्येकालाच या संकटाशी तोंड द्यावे लागले. अशाही काळात अनेकांनी आपल्या जिवाचा विचार न करता परिस्थिती सावरण्यासाठी समाजाभिमुख तसेच लोकाभिमुख कार्य केले. त्याचाच साक्षात पट शब्दरूपाने या पुस्तकातून युवराज बप्पा नळे यांनी मांडला असून, या पुस्तकाच्या वाचनातून कोरोनाविषयी जाणीव-जागृती होणार आहे. म्हणूनच जिल्ह्यातील १०० वाचनालये व शैक्षणिक संस्थांना 'कोरोना डेज' पुस्तकाचे वाटप करण्यात येईल असेही त्यांनी घोषित केले. अध्यक्षीय समारोपातून प्रा. डॉ.अरविंद देशमुख यांनी सांगितले की, समाजात विविध मान्यवरांच्या बरोबरीनेच वैज्ञानिकांचाही सन्मान होणे गरजेचे आहे. असे झाले तर त्यांच्या हातूनही मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी काम होईल असे ते म्हणाले. तर स्वतः लेखक युवराज नळे यांनी कोरोनाच्या काळात आलेले अनुभव कथन करताना संकटसमयी समाजोपयोगी कार्य करून वर्तमानातही माणुसकी जिवंत ठेवता येते. त्यासाठी कार्याला वाहून घ्यावे लागते हे या काळात अनुभवता आल्याचे स्पष्ट केले. प्रस्तुत शब्दप्रपंचातून आजच्या तरुण पिढी पुढे नवा विचार ठेवण्याच्या स्वच्छ भावनेतून हे पुस्तक लेखन केल्याचेही त्यांनी सांगितले. पुस्तक प्रकाशन प्रसंगी पुस्तकाची प्रस्तावना चित्रफितीद्वारे दाखविण्याचा अभिनव उपक्रम प्रथमतः आज यशस्वीरित्या करून डॉ. जयश्री पाटील यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना वाचक तसेच रसिकापर्यंत पोहोचविली. याचे मोठेच कौतुक झाले. कार्यक्रमास राजेंद्र अत्रे, माधव गरड, शेषनाथ वाघ, तौफिक शेख,हनुमंत पडवळ, बाळ पाटील, डॉ. कृष्णा तेरकर, प्रा.प्रशांत गुरव,प्रा.अभिमान हंगरगेकर, गणेश वाघमारे, बाबा गुळीग, डॉ. ‌रुपेशकुमार जावळे ॲड.कुलदीपसिंह भोसले यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रभाकर चोराखळीकर यांनी केले, तर आभार प्रा.डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी मानले. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच पत्रकार बंधु व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top