Views






*गाव तिथे पानवठा, बियाणे बॅंक सुरू करणार - जिल्हाधिकारी दिवेगावकर, पत्रकार संघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक गोळ्यांच्या किटचे वितरण*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासह ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. गावातल्या समस्या गावात कशा सुटतील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. मंडळनिहाय लोहशाही दिनाचा उपक्रम राबविण्यात येईल. गाव तिथे पानवठा उपक्रम राबवून शेतकरी, दानशुर लोकांच्या मदतीने गावात बियाणे बॅंक सुरू करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी दि.६ जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतरा चव्हाण सभागृहात वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले की, मराठवाड्यातील पत्रकारिता निजामाच्या काळात रुजली व वाढली आहे. येथील पत्रकारांनी समाजवादी विचार रुजविण्याचे काम केले आहे. अधिकाऱ्यांनी देखील स्वत:चा निर्णय चुकला असेल तर त्याची उजळणी करण्याचे धाडस दाखवायला हवे. जेथे जाणीव असते तेथेच सत्य असते. त्यामुळे पत्रकाराच्या टिकात्मक बातम्या असल्या तरी त्या सकारात्मक घेणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील शेतरस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येत आहेत. यासाठी पत्रकारांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. सध्या शहर व ग्रामीण अशी दुहेरी समिकरणाची सांगड सुरू असून शेतातील माणसाची श्रमसंस्कृती शहरातील माणसांमध्ये रुजल्या आहेत का ? हे शोधणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी गावच्या समस्या काय आहेत याचा आराखडा करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील चुका, प्रलंबित फेरफारची प्रकरणे आदी प्रश्नाकडे लक्ष देवून शासकीय योजनांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासात्मक कामाचा आराखडा मांडून त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करूत. जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंडळस्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. गावातून बाहेर जाणारा पैसा थांबविणे गरजेचे असून पिण्यासाठी, गावच्या वापरासाठी व जनावरांसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचेही योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गाव तिथे पानवठा ही योजना शेवटच्या गावापर्यंत कशी पोहचेल याकडेही लक्ष देण्यात येत आहे. वीज ट्रान्सफार्मरची समस्या सोडविण्यासाठी किती ट्रान्सफार्मर आवश्यक आहेत, याचा आराखडा बनवून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल. गाव तेथे देवराई उपक्रम राबवून रिकाम्या जागेत वृक्ष लागवड करणे, सीड बॅंक उभारणे यासह गावच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करूत, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिली. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेते शोयब मोमीण, पांडुरंग कुंभार, येनेशाम शेख, किरण जेटीथोर, केदार भोसले, गजेंद्र निकम, सोनू शिंदे, सलीम मोमीण, सादीक पटेल, अपूर्व माने, भागवत शिंदे, अप्पा शिरसाठे, विनोद हंडीबाग, किरण जेटीथोर, सुरेशकुमार घाडगे, श्रीकांत पवार, मनोज तवले, विलास मुळीक, हरी खोटे यांचा मान्यवरांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक गोळ्या, थंडीपासून बचाव करण्यासाठी टोपी आदी वस्तूंचे कीट देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर व आभार सरचिटणीस संतोष जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रमोद कांबळे, तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, अंबादास पोफळे, सुरेश घाडगे, गौतम चेडे, विलास मुळीक, पत्रकार अविनाश गायकवाड, प्रभाकर लोंढे, मल्लिकार्जून सोनवणे, उमाजी गायकवाड, निजाम शेख, किशोर माळी, अजित माळी, विनोद बाकले, दत्ता शिंदे, संतोष शेटे, सुरेश कदम, शंकर भोरे, अमजद सय्यद, सल्लाउद्दीन शेख, संतोष खुने, राहुल कोरे, इस्माईल सय्यद, संतोष जोशी यांच्यासह पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
पत्रकारांनी जनतेचा आवाज बनावे दर्पण दिनानिमित्त आज चिंतन, मंथन व सिंहावलोकन व्हावे, हिच अपेक्षा आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकार तर होतेच. पण ते एक समाजसुधारक होते. त्यांचे गणित, विज्ञान, तंत्रज्ञानासह संस्कृत भाषेवरही प्रभुत्व होते. आज मराठी पत्रकारितेचा झेंडा संपूर्ण भारतात डोलाने फडकत आहेत. कोरोना संकटकाळात वृत्तपक्ष क्षेत्रासमोरही विविध आव्हाने उभे टाकली असताना देखील आपण सजगपणे काम करीत आहात. पत्रकारांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देवून त्यांचा आवाज बनून कार्य करावे, असे मतही यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी व्यक्त केले.
आम्ही तर जनतेचे सेवक - डॉ. फड 
जिल्ह्याच्या विकासात्मक कामासाठी पत्रकारांची भूमिकाही महत्वूपर्ण असते, असे मत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पत्रकारांच्या बातम्यामुळेच जतनेचे मत तयार होत असते. त्यामुळे पत्रकारांनी विकासात्मक कामाकडे लक्ष देवून प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणून द्याव्यात. त्यामुळे दक्ष होवून चांगले काम करण्याची संधी मिळते. ही यंत्रणा जागृत राहिली तर विकास करणे अवघड नाही. कोणतेही काम मोठे नसते तर प्रत्येक काम तितक्याच ताकतीचे असते. लोकसेवक म्हणून काम करीत असताना रस्त्यावर भीक मागणारा भिकारी सुध्दा आमचा मालक आहे. कारण नागरिकांच्या टॅक्सच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशातूनच लोकसेवकांच्या पगारी होतात. त्यामुळे लोकसेवकाकडून सेवेची अपेक्षा करणे हा नागरिकांचा हक्क असल्याचे मत डॉ. फड यांनी व्यक्त केले. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार कोरोना संकट काळात जिल्हा प्रशासनाकडून गोरगरिब नागरिक, फेरीवाले, छोट्या व्यवसायिकांना मदत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांचा शेतरस्ते मजबूत करण्यासह स्वच्छतेचा उपक्रमही महत्वपूर्ण आहे. प्रशासनाच्या कामासाठी पत्रकार संघाचे नेहमी सहकार्य कार्य राहील. पत्रकार संघ प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल. गुडमॉर्निंग पथकात देखील पत्रकार सहभागी होतील व शासन, प्रशासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करतील, अशी ग्वाही, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी प्रास्ताविकात बोलताना दिली. सोलापूर-तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही यावेळी रणदिवे यांनी केली.
 
Top